अंबड : नगर पालिकेच्या जागेवर अतिक्रमण व अवैध बांधकाम प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. अंबड पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामधील १०५ संशयित आरोपींपैकी ८५ नावे समोर आली आहेत. तर २० संशयित आरोपींची नावे अद्यापही उजेडात येऊ शकलेली नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी निळकंठ जानकीराम सुरंगे याची पोलीस कोठडी मंगळवारी संपत आहे. प्रकरणाचे गूढ उकलण्यास पोलिसांना कितपत यश आले आहे, याविषयी मंगळवारी माहिती हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी याप्रकरणी लक्ष घातले असल्याने प्रशासन पुढील कारवाई करण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील क्रीम एरियामध्ये असलेल्या पालिकेच्या तब्बल १२ एकर १६ गुंठे जमिनीवर अतिक्रमण करुन अवैध बांधकाम केल्याप्रकरणी नगरपालिकेच्या तक्रारीवरुन अंबड पोलिसांत ७ एप्रिल रोजी जमीन विक्री करणाऱ्या व विकत घेणाऱ्या तब्बल १०५ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पालिकेने दिलेल्या तक्रारीत ही जागा विक्री करणाऱ्या, जागेवर प्लॉट घेणाऱ्या व त्यावर बांधकाम करणाऱ्या अशा एकुण ८५ संशयीत आरोपींची नावे नोंदविण्यात आली होती याबरोबरच अन्य अज्ञात २० अज्ञात व्यक्तींनी या जागेवर अतिक्रमण केल्याचे तक्रारीत म्हटले होते. (वार्ताहर)
अतिक्रमण, अवैध बांधकाम प्रकरणी ८५ जणांची नावे आली उजेडात..!
By admin | Updated: April 19, 2016 01:09 IST