उस्मानाबाद : मागील अनेक महिन्यांपासून निमशिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडलेला होता. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वेळोवेळी झालेल्या सर्वसाधारण सभेतही या विषयावर चर्चा होत होती. अखेर शुक्रवारी हा प्रश्न निकाली निघाला असून, ८२ जणांना रिक्त जागांवर नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर उर्वरित ४४ जणांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.वस्तीशाळा बंद झाल्यानंतर जवळपास १२६ वर शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळावरती तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. तसेच यापैकी अनेकांचे पत्राद्वारा डीएडीही करुन घेण्यात आले आहे. कालांतराने नियमित शिक्षक अतिरिक्त ठरल्यामुळे निमशिक्षकांच्या जागी अतिरिक्त गुरुजींचे समायोजन करण्यात आले. या प्रकारानंतर संबंधित निमशिक्षकांनी नियमित वेतनश्रेणी मिळावी म्हणून, वारंवार आंदोलने केली. तसेच शासन स्तरावरही पाठपुरावा केला. कालांतराने हा प्रश्न न्यायालयातही गेला.या सर्व प्रक्रियेनंतर शासनाने मागील काही महिन्यांपूर्वी या शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय घेतला. डीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या गुरुजींना नियमित वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले. जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला होता. यातून मार्ग काढत आता संबंधित निमशिक्षकांना त्यांच्या मुळ जागेवर नियुक्ती देण्याचे निश्चित झाले असून, तसे आदेशही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहेत. उर्वरित ४४ शिक्षकांसाठी जागा रिक्त नसल्याने त्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण उपसंचालक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.‘लोकमत’ ने केला होता पाठपुरावानिमशिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा प्रश्न राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी लावून धरला होता. नियमित वेतनश्रेणीचे आदेश मिळण्यास शिक्षण विभागाकडून विलंब झाल्याने मागील दोन सभांमध्ये जोरदार चर्चा झाली होती. अखेर हा प्रश्न शुक्रवारी निकाली निघाला आहे.
८२ निमशिक्षकांचा जीव भांड्यात !
By admin | Updated: July 19, 2014 00:43 IST