दिनेश गुळवे, बीडखरीप हंगामात आतापर्यंत तब्बल सव्वादोन लाख शेतकऱ्यांना ८१६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने शंभर टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. तर, काही बॅँकांनी अद्याप पीक कर्ज वाटपाचे ‘खाते’ही उघडलेले नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच आहे. यावर्षी जिल्ह्याला खरीप हंगामात १ हजार २६१ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर व विनासायास पीक कर्ज दिले जावे यासाठी जिल्हा प्रशासनासह बॅँकेच्या जिल्हा व्यवस्थापकांकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. जिल्ह्यात ६५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. हे पीक कर्ज सहकारी, राष्ट्रीय बॅँका, खाजगी बॅँकांकडून देण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ३७३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होेत. या बॅँकेच्या जवळपास ५९ शाखांमधून पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हा बॅँकेने गतवर्षीही उद्दिष्टापेक्षा अधिक पीक कर्जाचे वाटप केली होती. सहकारी बॅँका कर्ज देण्यात आघाडीवर असल्यातरी खाजगी बॅँका मात्र शेतकऱ्यांना दारातही उभा करीत नसल्याचा आरोप शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केला. सिंडेकेट बॅँक व एच.डी.एफ.सी या बॅँकेची टक्केवारी अद्यापही शून्यावरच आहे. या खरीप हंगामात आतापर्यंत २ लाख २२ हजार ७३४ शेतकऱ्यांना ८१६ कोटी ७२ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक बोकाडे यांनी दिली. अद्यापही अनेक शेतकरी बॅँकेकडे पीककर्जासाठी खेटे घालीत आहेत. त्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्याची मागणी होत आहे. पीककर्जाचे उद्दिष्ठ पूर्ण होईलपीक कर्ज वाटपा संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, पीक कर्ज गतीने देण्यासाठी बॅँकांना सूचना दिल्या आहेत. ज्या बॅँका पीक कर्ज देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यावर्षी पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
८१६ कोटींचे पीककर्ज
By admin | Updated: July 19, 2014 00:40 IST