उस्मानाबाद : अपुऱ्या पावसामुळे मागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ यामुळे खरीप, रबी हंगाम हातचा जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे़ परिणामी डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असून, इतर समस्यांचाही सामना करावा लागत आहे़ आर्थिक विवंचनेत अडकलेल्या तब्बल २१२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्कारला आहे़ यातील केवळ १२० जणांना शासकीय मदत मिळाली असून, उर्वरित तब्बल ७६ प्रस्ताव अपात्र ठरविल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला काहीच मदत मिळालेली नाही़राज्यात विशेषत: मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा व परिसरात मागील काही वर्षापासून सरासरीच्या निम्म्याहून कमी प्रमाणात पाऊस पडत आहे़ अपुरा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचा प्रमुख हंगाम असलेल्या खरिपासह रबीचे पीकही शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत़ मागील वर्षी तर चक्क पावसाने पाठ फिरविल्याने खरिपासह रबी हंगामही वाया गेला़ परिणामी डोक्यावरील वाढते कर्ज, मुला-मुलींचे लग्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे़ अनेक समस्यांचा सामना करून जीवनाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील तब्बल १६४ शेतकऱ्यांनी मागील वर्षी गळफास लावून आत्महत्या केली होती़ यात सर्वाधिक २६ शेतकऱ्यांनी आॅक्टोबर महिन्यात आत्महत्या केली होती़ यात मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात ९, फेब्रुवारी महिन्यात १३, मार्च व एप्रिल महिन्यात प्रत्येकी १२, मे महिन्यात १३, जून महिन्यात ११, जुलै महिन्यात १०, आॅगस्ट महिन्यात २०, सप्टेंबर महिन्यात १२, आॅक्टोबरमध्ये २६, नोव्हेंबरमध्ये ८ तर डिसेंबर मध्ये १८ अशा एकूण १६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती़ यातील ९८ शेतकरी आत्महत्येचे प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या वारसांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले होते़ तर तब्बल ६६ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले होते़चालू वर्षात आजवर तब्ब्ल ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे़ यात जानेवारी महिन्यात १३, फेब्रुवारीत ११, मार्चमध्ये ८, एप्रिल महिन्यात १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे़ चालू वर्षातील २२ प्रस्ताव पात्र ठरवून त्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे़ तर १० प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत़ चालू वर्षात आजवर २२ लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे़ यातील बहुतांश अपात्र प्रस्तावांमध्ये शेतजमीन नावावर नसणे हेच प्रमुख कारण दाखविण्यात आले आहे़ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन नाही म्हणून त्याच्या वारसांना मदत करण्यात येत नाही़ शेतजमीन नावावर नसेल तर शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी ठरत नाही का ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या वारसांमधून वेळोवेळी उपस्थित करण्यात आला आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे ही अट रद्द करण्याची घोषणा केली होती़ ही घोषणाही हवेतच विरल्याचे चित्र आहे़ एकूणच वाढत्या दुष्काळाच्या झळा पाहता शेतकऱ्यांसमोरील प्रश्न गंभीर होत आहेत़ प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ सुरू असलेल्या उपाययोजनाही अपुऱ्या ठरत आहेत़ अशा परिस्थितीत ही अट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांसाठी त्रासदायक अशीच आहे़ त्यामुळे शासनाने शेतजमीन नावावर असण्याची अट रद्द करावी, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)
शेतकरी आत्महत्येचे ७६ प्रस्ताव अपात्र
By admin | Updated: May 8, 2016 23:36 IST