वडीगोद्री : अंबड तालुक्यातील कुरण शिवारात गोदावरी नदीच्या काठी अनेक ठिकाणी वाळू माफियांनी वाळूची मोठी साठवणूक करून ठेवलेली आहे. या साठवणीतील वाळूची राजरोसपणे वाहतूक होत आहे. यावर महसूल विभाग काहीच कारवाई करत नसल्याचे दिसून येते. पोलिसांनी रविवारी पाहटे वाळू साठ्यातून वाळू उचलणाऱ्या दोन जेसीबी, ३ वाहनचालकांसह पाच जणांना अटक करून वाळूसह ७१ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.गोदाकाठावर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करण्यात येत असून, वाळू माफियांनी नदीकाठावर अनेक ठिकाणी वाळूचे मोठ मोठे ढिगारे करून वाळू साठा केला आहे.रविवारी गोंदी पोलिसठाण्याचे सपोनि सिताराम मेहेत्रे, उपनिरीक्षक सोमनाथ शिंदे, सहकारी श्रीधर सानप, डि.बी. काजळे, खांडेवार, मराडे आदींच्या पथकाने साठ्यावरील वाळूची जेसीबी यंत्राच्या माध्यमातून टिप्पर मध्ये वाळू भरतानाच कारवाई केली.या प्रकरणी हायवा चालक किशोर प्रेमचंद घोरपडे (रा. धनगरवाडा ता. पैठण), मतीन रफिक शेख , नवजाद फारूख पठाण (रा. पिंपळवाडी ता. पैठण), जेसीबी चालक अभिमान सापते (रा. कदमवाडी) व अफजल रसूल या पाच जणांना अटक केली.तर अवैध वाळू भरण्यासाठी हायवा, जेसीबी मशीन बोलावले म्हणून केशव वायभट (रा. मोहिते वस्ती अंकुशनगर) व शेख वसीम शे. करीम (रा. शहागड) या दोघांसह अटक केलेल्या ५ जणाविरूद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
७१ लाखांचा वाळूसाठा व वाहने जप्त
By admin | Updated: August 17, 2015 01:02 IST