लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : डीएमआयसी अंतर्गत शेंद्रा ते बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क ते वाळूज औद्योगिक वसाहत या ‘इंडस्ट्री ट्रँगल’ साठी स्वतंत्र मार्ग बांधण्याचा प्रस्ताव नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आला असून, ९०० कोटींचा हा प्रकल्प औरंगाबाद ते पैठण मार्गे शेवगाव या रस्त्यासह १९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हे दोन्ही वेगवेगळे रस्ते असताना त्यांचा संयुक्त प्रस्ताव तयार होण्याचे संकेत या प्रकल्पाचा डीपीआर (डिटेल प्रकल्प अहवाल) कधी तयार होणार, एवढा निधी कसा उभा करणार, काम केव्हा सुरू होणार, असे प्रश्न पुढे येत आहेत. हा नवीन नॅशनल हायवे म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे. सहा महिन्यांत डीपीआरचे काम पूर्ण होईल, असा दावा नॅशनल हायवे अॅथॉरिटीने जानेवारी २०१७ मध्ये केला होता. अद्याप डीपीआरच्या कामालाच मुहूर्त लागलेला नाही. शिवाय औरंगाबाद ते पैठण या रस्त्याचा एमएसआरडीसीने तयार केलेला डीपीआर नॅशनल हायवे अॅथॉरिटीने फेटाळला. त्यामुळे नव्याने डीपीआर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या, मात्र यात सहा महिन्यांचा कालावधी गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९०० कोटींचा शेंद्रा ते बिडकीन मार्ग वाळूज हा आठ पदरी मार्ग करणे प्रस्तावित आहे. डीपीआरचे काम तज्ज्ञ अभियंत्यांअभावी थांबले होते. शिवाय औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचे देखील यात समायोजन झाले आहे. त्यासाठी भूसंपादनासह १ हजार कोटी लागण्याचा अंदाज आहे. सध्या ३० मीटर रुंद तो रस्ता आहे. ३० मीटर नव्याने भूसंपादन केल्यास तो रस्ता नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या निकषाप्रमाणे पूर्ण करता येईल. १९० किलोमीटरच्या कामाला १९०० कोटी रुपये भूसंपादनासह लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे.
७०० कोटीचे काम; गेले १९०० कोटीवर
By admin | Updated: July 12, 2017 00:48 IST