येरमाळा : घरगुती वीज धारकांची वीज जोडणी तोडून वर्ष झाले तरीही वीज वितरण कंपनीने त्या ग्राहकास ५८ हजार रुपयाचे वीज बिल देऊन गलथान कारभाराचा नमुना दाखवून दिला आहे. दहिफळ येथील चंद्रसेन तुकाराम लोहार यांचे (मीटर क्र. ७६१५५६१८४७) यांचे वीज कनेक्शन बिल थकल्यामुळे जून २०१३ मध्ये कट करण्यात आले. परंतु, यानंतरही सतत त्यांना बिले येत असून, ती बिले घेऊन ते प्रत्येकवेळी दहिफळ उपकेंद्रात जमा करतात. वर्षात दोन वेळा त्यांच्या घरी लाईनमन येऊन मीटर बंद असल्याचा अहवालही घेऊन गेले. मात्र बिल येणे काही थांबलेले नाही. चालू महिन्यात याच ग्राहकास ५८ हजार रुपयाचे बिल देण्यात आले आहे. मीटर रीडिंग न घेताच वीज बिल वाटप करणे हा वीज वितरण कंपनीचा नेहमीचा कारभार असला तरी थकबाकीअभावी कनेक्शन कट केल्याच्या नोंदीही ठेवल्या जात नसल्याचे या बिलावरून दिसून येत आहे. मीटर रीडिंग घेण्याचे काम खाजगी एजन्सीला दिले असल्याचे सांगत अधिकारी टोलवाटोलवी करत असले तरी बंद मिटरला बिले येत असल्याने ही चूक कुणाची, असा प्रश्न समोर येत आहे. दरम्यान, याबाबत दहिफळ उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता सी. एस. जाधव म्हणाले की, या मीटरचे बिल दुरुस्तीसाठी कळंब कार्यालयात दिले आहे. मात्र, तेथे बिल प्रलंबित आहे. (वार्ताहर)
वीज जोडणी तोडल्यानंतरही दिले ५८ हजारांचे बिल !
By admin | Updated: July 22, 2014 00:17 IST