गजेंद्र देशमुख , जालनाजिल्ह्यात गत दोन महिन्यांत जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने केलेल्या अणुजीव पाणी तपासणीत तब्बल ५०४ नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक विहिरी, कूपनलिका तसेच गावांना पाणीपुरवठा करणारे इतर जलस्त्रोतांमधील पाणी नमुन्यांची तपासणी जिल्हा प्रयोग शाळेत करण्यात येते. गत काही महिन्यांत दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तपासणीवरून स्पष्ट होते. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा आढावा घेतल्यास दोन महिन्यात अनुक्रमे ३१७ व १८७ पाणी नमुने दूषित आढळून आले. यात कोलीफॉर्म जंतूचे प्रमाण आढळून येते. दूषित पाण्यामुळे साथरोग वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा प्रयोग शाळेतील अणुजीव व रासायनिक दोन प्रक्रियेद्वारा पाणी तपासणी होते. यात अुणजीव तपासणीत दूषित पाणी आढळून आले. ब्लिचिंग पावडरचा योग्य वापर केल्यानंतर तसेच पुन्हा तपासणी केल्यानंतर पाणी वापरावे, असे आवाहन प्रयोगशाळेच्या वतीने करण्यात येते. सार्वजनिक विहिरी व कूपनलिकांच्या भागात अस्वच्छता तसेच ब्लिचिंंग पावडर न वापरल्याने जलसाठे दूषित होतात.आॅक्टोबर महिन्यात बदनापूर तालुक्यातील १३१ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात दोन नमुने दूषित आढळले. भोकरदन १७५ पैकी ५६, घनसावंगी ९६ पैकी ६०, जाफराबाद ५५ पैकी २४, जालना २३४ पैकी १२७,मंठा २२पैकी ६, परतूर ७८ पैकी ४२ नमुने दूषित आढळून आले आहेत. ४जालना नगर पालिका हद्दीतील चार नमुने दूषित आढळून आले. एकूणच अणुजीव तपासणीत दूषित पाण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. याविषयी प्रयोग शाळेच्या तंत्रज्ञ ठोंबरे म्हणाल्या, पाणी तपासणीचे नमुने देतानाच संबंधितांना ब्लिचिंग पावडरसह अन्य औषधींचा वापर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जाते.नोव्हेंबर महिन्यात बदनापूर तालुक्यात १३६ पैकी १ नमुने दूषित आढळून आला. भोकरदन १७५ पैकी ३३, घनसावंगी ७९ पैकी २७, जाफराबाद २८ पैकी ४, जालना २१५पैकी ७४, मंठा २० पैकी ८ तर परतूर ८९ पैकी ४० नमुने दूषित आढळून आले.
अणुजीव तपासणीत २ महिन्यांत ५०४ नमुने आढळले दूषित
By admin | Updated: December 9, 2015 23:57 IST