बाबूराव चव्हाण , उस्मानाबादजिल्हा परिषदेअंतर्गत चालविण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोयीसुविधानियुक्त ‘आॅपरेशन थिएटर’ उभारण्यात आली आहेत. मात्र त्याचा वापर केला जात नसल्याने जवळपास ५० टक्के ‘आॅपरेशन थिएटर’साठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी धूळखात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे आॅपरेशन थिएटर बंद असल्याने ग्रामीण भागातील रूग्णांना मोठ्या प्राणात त्रास सोसावा लागत आहे.ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच उपकेंद्रही चालविली जातात. जिल्ह्यात ४३ आरोग्य केंद्र तर दोनशेपेक्षा अधिक उपकेंद्र आहेत. शस्त्रक्रियांची गरज लक्षात घेवून आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी ‘आॅपरेशन थिएटर’ उभारण्यात आले आहेत. परंतु, यापैकी ५० टक्के थिएटर बंद आहेत. विशेष म्हणजे यामध्ये भूम तालुक्याचा पहिला क्रमांक लागतो. भूम तालुक्यात एकाही केंद्रातील आॅपरेशन थिएटर सुरू नाही. त्यानंतर उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, कोंड आणि पोहनेर. परंडा तालुक्यातील आनाळा. तुळजापूर तालुक्यातील सलगरा, मंगरूळ. उमरगा तालुक्यातील येणेगूर, अणदूर आणि आलूर. तसेच लोहारा आणि कळंब तालुक्यातील काही केंद्रातील ‘थिएटर’ बंद आहेत. विशेष म्हणजे ही सुविधा सुरू करण्यायोग्य असतानाही स्थानिक अधिकाऱ्यांकडून त्याकडे डोळेझाक केली जात असल्याबाबतच्या तक्रारी आता होवू लागल्या आहेत. या सर्व गोंधळामुळे कोट्यवधींची यंत्रणा धूळखात पडून आहे. याकडे आता जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.महिलांना सोसाव्या लागताहेत वेदनाअत्याधुनिक ‘आॅपरेशन थिएटर’ उभारण्यात आलेले असतानाही ते उपायोगात आणले जात नाही. त्यामुळे अशा आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांना शेजारच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे लागत आहे. असे असतानाही आरोग्य केंद्रांकडून ही समस्या गांभीर्याने घेतली जात नसल्याचे समोर येत आहे.सात केंद्रांमध्ये नाही सुविधाईटकूर, माकणी, सावरगाव, ढोकी, नळदुर्ग, कानेगाव आणि शिराढोण या ठिकाणी आरोग्य केंद्र चालविण्यात येत असली तरी या ठिकाणी ‘आॅपरेशन थिएटर’ची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील रूग्णांना शस्त्रक्रियांसाठी शेजारच्या दवाखान्यांवर अवलंबून रहावे लागत आहे.सदस्यांनाही नाही सोयरसुतक४भूम तालुक्यातील एकाही आरोग्य केेंद्रातील ‘आॅपरेशन थिएटर’ सुरू नाही. याबाबत सदस्यांनी सभागृहामध्ये आवाज उठविणे आवश्यक असते. परंतु, सर्वसामांन्याच्या हिताच्या या प्रश्नाबाबत जिल्हा परिषद सदस्य ‘ब्र’ शब्दही बोलत नाही, विशेष. प्रत्येक बैठकीमध्ये ‘स्व’ हिताच्या प्रश्नावरच सभागृह डोक्यावर घेतले जाते. मात्र, लोकांचे प्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या या मंडळीला सर्वसामान्यांचे प्रश्नाचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.४एकीकडे शासन कुटुंबकल्याण कार्यक्रमाला गती देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरोग्य केंद्रांना सुसज्ज ‘आॅपरेशन थिएटर’ बांधण्यात आले आहेत. परंतु, जिल्हाभरातील ५० टक्के ‘थिएटर’चा वापरच केला जात नसल्याचा याचा फटका शासनाच्या कुटुंबकल्याण कार्यक्रमालाही बसत आहे. परिणामी शस्त्रक्रियांची संख्या अपेक्षित गतीने वाढत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.अनेक ठिकाणी ‘आॅपरेशन थिएटर’ सुरू करण्याच्या स्थितीत असतानाही ते बंद असून ती सूरू करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच तालुकास्तरावरून अहवाल मागविण्यात आला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
५० % ‘आॅपरेशन थिएटर’ बंदच !
By admin | Updated: January 21, 2015 01:09 IST