सोयगाव तालुक्यात जिल्हा अभियान कक्षाच्या वतीने ६३५ महिला बचत गट आहेत. त्यातील फर्दापूर, धनवट, सावळदबारा, नांदातांडा, जामठी, जंगला तांडा, रवाळा, जरंडी, बहुलखेडा, निंबायती आणि हनुमंतखेडा या ११ गावांची निवड करण्यात आली. या बचत गटांतील महिलांना पैठणी क्लस्टर विणण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे आता पैठण पाठोपाठ सिल्लोड-सोयगावची पैठणी बाजारात येणार आहे. त्याचप्रमाणे जरंडी, गोंदेगाव, बनोटी, फर्दापूर आणि सावळदबारा या सहा गावांमध्ये ‘९९ महिला मॉल’ ही संकल्पना राबविली जाणार असून यातील कोणत्याही वस्तू या ९९ रुपयांत मिळणार आहे. तालुका कक्ष व्यवस्थापक प्रदीप देवरे यांनी महिलांना प्रशिक्षणासाठी स्थळ पाहणी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे सोयगाव तालुक्यात महिला बचत गटांचे टमाटे, आद्रक, मिरची, कांदा प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार आहे.
चौकट..
प्रत्येक महिलेला मिळणार कर्ज
शासनाच्या महिला बचत गटांचा ५० कोटींचा प्रकल्प सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील महिला बचत गटांसाठी आहे. यात प्रत्येक गटाच्या महिला सदस्यांना स्वतंत्र उद्योगासाठी प्रती महिला ५० हजार रुपये कर्ज देण्यात येणार आहे. यामध्ये सोयगाव तालुक्यातील २ हजार महिलांना लाभ मिळणार आहे. प्रकल्प राबविण्यासाठी तालुका व्यवस्थापक प्रदीप देवरे, प्रभाग व्यवस्थापक सत्यजित राठोड, राम खर्जुले आदी पुढाकार घेत आहेत.