जालना : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. ६४ प्रकल्पांत आज रोजी केवळ ५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी तीन ते चार महिने जिल्हावासियांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. पशुधनही संकटात सापडले आहे.आगामी काळात जालना शहरातही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. घाणेवाडी जलाशयात अत्यल्प पाणीसाठा आहे. आठवडाभरात हा साठा पूर्णपणे अटेल असा अंदाज पालिकेतील सूत्रांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी फक्त १४ टक्के आहे. तर लघू प्रकल्पात १.३६ टक्के जलसाठा आहे. दोन्ही मिळून केवळ ५ टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्पांपैकी तीनची पाणी पातळी जोत्याखाली आहे. ० ते २५ टक्के पाणीसाठा असलेले दोन तर २६ ते ५० टक्के जलसाठा असलेले २ प्रकल्प आहेत. ५७ लघू प्रकल्पांपैकी तब्बल ३० कोरडेठाक पडले आहेत. १९ ची पाणी पातळी जोत्याखाली आहे. ० ते २५ टक्के पाणीसाठा असलेले ७ प्रकल्प आहेत. २६ ते ५० टक्के पाणीसाठा असलेले केवळ एकच लघू प्रकल्प आहे. या भयावह आकडेवरून परिस्थिती किती भयावह आहे हे लक्षात येते. शहरीभागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाई उग्ररूप धारण करीत आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. कल्याण गिरजा प्रकल्पांत २९ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्प जोत्याच्या पातळीखाली, अप्पर दुधना प्रकल्प ४३ टक्के, जुई मध्यम प्रकल्पांत ९ टक्के, धामणा मध्यम प्रकल्पांत शुन्य टक्के, जीवरेखा धरणात ० टक्के, गल्हाटी मध्यम प्रकल्पांत ११ टक्के पाणीसाठा आहे. अप्पर दुधना प्रकल्प वगळता बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला आहे.
६४ प्रकल्पांत ५ टक्के जलसाठा
By admin | Updated: March 18, 2016 01:50 IST