औरंगाबाद : शहरातील बच्चे कंपनीला खेळण्यासाठी फारशी मैदाने नाहीत. चांगली उद्याने नाहीत. करमणुकीसाठी मुलांना शहरात जास्त वाव नाही. परिणामी लहान मुले मोबाईल आणि इंटरनेटच्या विळख्यात सापडत चालली आहेत. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून शहरात पाच बालोद्यान विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कामासाठी सुमारे २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात निधीसाठी तरतूदही करण्यात आली आहे.शहरात महापालिकेच्या मालकीचे १०० पेक्षा अधिक उद्याने आहेत. यातील बोटावर मोजण्याएवढीच उद्याने चांगली आहेत. १५ लाख लोकसंख्येच्या शहरात बच्चे कंपनीसाठी चांगले उद्यान म्हणजे ‘सिद्धार्थ’ होय. अनेक पालकांना सिद्धार्थ उद्यान लांब होते. पालकांची ही अडचण लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या भागात पाच बाल उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्यानांमध्ये बच्चे कंपनीला खेळण्यासाठी पूर्णपणे विविध साहित्य ठेवण्यात येणार आहेत. सिडको एन-१ भागातील उद्यानाची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संग्रामनगर येथील उद्यान बालकांसाठी निवडण्यात आले. अलंकार सोसायटी, नंदनवन कॉलनी आणि टी.व्ही. सेंटर रोडवरील स्वामी विवेकानंद उद्यान विकसित होणार आहे. प्रत्येक उद्यानाच्या विकासासाठी स्वतंत्रपणे ५ लाखांची तरतूद केली आहे. पाच उद्यानांवर २५ लाख रुपये खर्च होणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील आणखी काही उद्यानांची निवड दुसऱ्या टप्प्यात करण्याचा विचार प्रशासन करीत आहे.
शहरात ५ बाल उद्यान उभारणार
By admin | Updated: November 7, 2016 01:06 IST