लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अजूनही ग्रामस्थांना दूषित पाणीच प्यावे लागत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात टंचाईमुळे ग्रामस्थ नाईलाजाने मिळेल त्या स्त्रोताचे पाणी पिण्यासाठी वापरतात. तर आगामी काळात पावसाळ्यामुळे अनेक स्त्रोतांचे पाणी दूषित होते. मे महिन्याच्या अहवालानुसार १0६७ पैकी ४७८ पाणीनमुने दूषित आढळले आहेत.हिंगोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायतींमध्ये समन्वय नसल्याचा प्रकार अनेकदा दिसून येतो. दर महिन्याला दूषित पाणी नमुने तपासले जातात. तरीही त्यांची संख्या फारसी घटत नसल्याचेच चित्र आहे. मे महिन्यात तपासणी केली असता जवळपास ४५ टक्क्यांपेक्षा पाणीनमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अर्धी जनता तर शुद्ध पाणीपुरवठ्यापासून वंचि असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पाण्यामुळे होणारे आजार व कोणते पाणी प्यावे याबाबत काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र तरीही हे चित्र असेल तर त्यातून काहीच बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे.आरोग्य यंत्रणांकडून ग्रामपंचायतींची जागृती करण्याची प्रक्रिया अधूनमधून घडते. मात्र तरीही ब्लिचिंग पावडर टाकण्याची तसदी घेतली जात नाही. परिणामी, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीनमुने दूषित आढळत आहेत. अनेक ग्रामपंचायती तर ब्लिचिंगच खरेदी करीत नाहीत. काही गावांत तर वारंवार सूचना दिल्यानंतरही कोणताच बदल होताना दिसत नाही. केवळ साथीचे आजार उद्भवल्यास तेवढ्यापुरती जागृती होते. उपायही केले जातात.भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच पाणीतपासणी प्रयोगशाळा अशा दोन यंत्रणांकडून जिल्ह्यात तपासणी होते. यात कळमनुरी उपविभागात प्राथमिक आरोग्य केंद्र मसोडअंतर्गत ७९ पैकी ३३ नमुने दूषित, वाकोडीत ७५ पैकी ३१, बाळापूरचे ९७ पैकी ४0, पोत्र्याचे ३0 पैकी १९, रामेश्वर तांड्याचे २३ पैकी १२, नर्सी नामदेवचे १५ पैकी १३, सिरसम बु.चे १४ पैकी १0, भांडेगावचे १६ पैकी ११, साखऱ्याचे ३ पैकी ३, कापडसिंगीचे ६९ पैकी ५४ नमुने दूषित आढळले. काही ठिकाणी आरोग्य सेवक नमुने देतात. तर ग्रामपंचायतींचे जलसुरक्षक मात्र टाळाटाळ करीत आहेत.
४७८ पाणीनमुने आढळले दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 23:40 IST