सुभाष माद्रप, डिग्रस कऱ्हाळेमागील ४७ वर्षांपासून संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम व सोहळ्याची परंपरा डिग्रस येथील ग्रामस्थांनी आजतागायत जपली आहे. अखंडित राहिलेल्या या परंपरेला परिसरातील भाविकांनी उपस्थिती राहून साथ दिली आहे. यंदा १६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता आगमन होणाऱ्या या पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी तयारी केली आहे. हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम प्रतिवर्षी राहतो. मागील ४७ वर्षांपासून डिग्रसवासियांनी ही परंपरा जपली असून ती नव्या पिढीकडे सुपूर्द केली आहे. आता हळूहळू सर्वच दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत असताना डिग्रस येथील ग्रामस्थांनी दिंडीच्या स्वागताची तयारी केली आहे. कारण डिग्रस येथील ग्रामस्थांसारखे स्वागत आणि तयारी कुठेही नसल्याचे दिंडीतील प्रत्येक वारकरी सांगतो. म्हणूनच प्रतिवर्षी कौतुकास पात्र राहून ग्रामस्थ दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करतात. यंदा १६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता डिग्रस येथे या पालखीचे आगमन होणार आहे. ग्रामस्थांनी प्रतिवर्षीप्रमाणे या पालखीच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. त्यात भाविकांच्या आरोग्यापासून भोजनापर्यंतची व्यवस्था ग्रामस्थांनी केली आहे. प्रारंभी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ पालखीच्या मिरवणुकीस सुरूवात होणार आहे. सवाद्य काढण्यात येणाऱ्या या दिंडी मिरवणुकीचे विसर्जन महारूद्र हनुमान मंदिराजवळ होणार आहे. त्यानंतर भाविक आणि उपस्थितांसाठी नगरभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होणार आहेत. १७ जून रोजी पहाटे ४ वाजता काकडा भजन होणार आहे. त्यानंतर ५ वाजता पंढरपूरकडे ही पालखी प्रयाण करणार आहे. मागील ४७ वर्षांपासून डिग्रस येथे हा सोहळा होत आहे. त्यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहतात. रात्रभर कार्यक्रम होणार असल्यामुळे महावितरणने रात्रीचे भारनियमन कमी करावे. गतवर्षी वीज दिली होती त्याप्रमाणे यंदाही वीज देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नर्सी नामदेव येथे जय्यत तयारी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पायदळ पालखीचे १६ जून रोजी सकाळी ११ वाजता नर्सी येथे आगमन होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी नर्सी व परिसरातील भाविकांनी तयारी केली आहे. सेनगाव येथून निघालेली ही पालखी नर्सी येथे सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. पूर्वी ही दिंडी गावातून हत्ती, घोडे, पालखीसह जात होती; परंतु गेल्या दोन वर्षांपासून हत्ती, घोडे, बाहेरून जात आहेत. भजनी, पताका घेवून भाविक नर्सीच्या मुख्य रस्त्यावरून जातात. ‘श्री’च्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. तसेच गणेशलाल बाहेती, डॉ. देशमूख व ग्रामस्थांनी महाप्रसादासाठी पुढाकार घेतला आहे. भाविकांनी पोलिस प्रशासनास मदत करण्याचे आवाहन सपोनि अशोक जाधव यांनी केले आहे.
४७ वर्षांची परंपरा
By admin | Updated: June 16, 2014 00:13 IST