कळंब : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील माळीनगर येथील गिताई प्रतिष्ठानने हात पुढे केले असून, बुधवारी कळंब येथे झालेल्या एका कार्यक्रमात तालुक्यातील ४० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी रोख ११ हजार रुपयाची व धान्याची मदत वितरित करण्यात आली. कळंब तालुका पत्रकार संघ व महसूल प्रशासन कळंब यांनी कळंब तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करावी यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील काही सामाजिक संघटनांना आवाहन केले होते. यास माळीनगर (अकलूज, जि. सोलापूर) येथील गिताई प्रतिष्ठानने सकारात्मक प्रतिसाद देऊन मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कळंब तालुका भयान दुष्काळी स्थितीला सामोरा जात आहे. २२ महिन्यात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कळंब पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी कळंब पत्रकार संघ, महसूल प्रशासन व गिताई प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ‘विचार बदला, दिवस बदलतील’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी दि. सासवड माळी शुगर लि. चे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे तर गिताई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. विद्या एकतपुरे, सचिव स्मिता म्हेत्रे, खजीनदार चेतन तम्हाणे, डॉ. भूषण म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव विशाल सोनटक्के, माजी जिल्हाध्यक्ष अनंत आडसूळ, बालाजी निरफळ, ज्ञानेश्वर पतंगे, सभापती जयश्री कांबळे, माजी उपसभापती लक्ष्मण आडसूळ, तहसीलदार प्रदीप उबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी २०१३-१४ व १४-१५ मध्ये आत्महत्या केलेल्या कळंब तालुक्यातील ४० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मान्यवरांच्या हस्ते रोख एक हजार रुपये, दहा हजाराचा धनादेश, पाच किलो तांदूळ, गहू व साखरेचे वाटप करण्यात आले. कुटुंबाचे सर्वेक्षण करणार - गिरमे दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला नेमकी कोणती मदत करायला हवी, याचे माळीनगर शुगरच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येईल. शेतकऱ्यांना कारखान्यातर्फे मोफत खताचा पुरवठा करण्यात येईल, तसेच जिल्ह्यातील ११० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करण्यात येईल, असेही गिरमे यांनी सांगितले. (वार्ताहर)
४० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत
By admin | Updated: September 17, 2015 00:26 IST