लातूर : मुदत संपलेल्या ३९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र घेणे व भरण्यास प्रारंभ होणार आहे. ७ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. तर २२ एप्रिलला मतदान होणार आहे. याशिवाय, ४५ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूकही याचवेळी होणार आहे.जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना सोमवारी जारी केली. ३० मार्चपासून नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृती होणार आहे. ७ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र भरण्याची शेवटची मुदत आहे. २, ३ व ५ एप्रिल हे सुटीचे दिवस वगळून नामनिर्देशनपत्र भरता येतील. ८ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. संबंधित तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १० एप्रिल असून, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १० एप्रिल रोजीच उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. दुपारी ३ नंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिन्हांचे वाटप होईल. २२ एप्रिल रोजी या ३९५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी २३ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार निश्चित करतील, त्या ठिकाणी मतमोजणी होईल. २५ एप्रिल रोजी या ग्रा.पं.चा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिली. (प्रतिनिधी)पहिल्या टप्प्यात ३९५ ग्रामपंचायतींबरोबर ४५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही आहेत. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही ३९५ ग्रामपंचायतींप्रमाणेच आहे. पोटनिवडणुकीच्या मतदानाची वेळ मात्र सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंत राहणार आहे. पोटनिवडणुकीसाठी लातूर तालुक्यातील भोईसमुद्रगा, अंकोली, रायवाडी, ममदापूर, औसा तालुक्यातील सारणी, बोरगाव (ऩ) काळमाथा, मातोळा, किल्लारी, रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी, शेरा, धवेली, उदगीर तालुक्यातील मलकापूर, डिग्रस, बनशेळकी, मोर्तळवाडी,हैबतपूर, तिवटग्याळ, मोघा, अहमदपूर तालुक्यातील वळसंगी, राळगा, वरवंटी, चाकूर तालुक्यातील महांडोळ, मष्णेरवाडी, देवणी तालुक्यातील हिसामनगर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी, हणमंतवाडी, बाकली, दैठणा, बेवनाळ, रापका, जळकोट तालुक्यातील येवरी अशा एकूण ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत़ तर निलंगा तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुकीत समावेश नाही़ ३० मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्रांची स्वीकृती व विक्री होणार आहे. त्यात २, ३ व ५ एप्रिल अशा तीन सुट्या आहेत. नऊ दिवसांपैकी तीन दिवस सुट्या आल्याने सहा दिवसच अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी आहेत. १० एप्रिलला चिन्हांचे वाटप होणार आहे. आणि २२ एप्रिल रोजी मतदान आहे. उमेदवारांना केवळ १२ दिवसच प्रचाराला मिळणार आहे. १२ दिवसांत उमेदवारांना निवडणुकीचा फड जिंकायचा आहे.
३९५ ग्रा.पं.ची रणधुमाळी
By admin | Updated: March 31, 2015 00:38 IST