परभणी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात सहा ठिकाणी छापे टाकून ३८ हजार ४१० रुपयांची दारू जप्त केली.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विनापरवाना दारु विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली. ५ व ६ आॅक्टोबर असे दोन दिवस विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. परभणी तालुक्यातील झरी येथे गोपाळ देशमुख यांच्या ताब्यातून १९ हजार २०० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. परभणी शहरातील विसावा फाट्याजवळील हॉटेल शिवशाही ढाब्यावर छापा मारुन या ठिकाणी ८ हजार ३१० रुपयांची दारू जप्त केली. पोखर्णी फाट्यावर आरोपी रामेश्वर कच्छवे याच्या ताब्यातून १३५० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तसेच जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा, हाटेल गंगासागर मालेगाव फाटा आणि जालना रोडवरील जगदंबा ढाबा या ठिकाणीही छापा मारुन तीन आरोपींकडून दारू जप्त करण्यात आली. या सर्व छाप्यामध्ये ३८ हजार ४१० रुपयांची विनापरवाना दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी.एल. दिंडकर, निरीक्षक जे.एच. पाटील, दुय्यम निरीक्षक बी. के. अवचार, ए. ए. शेळके, यु. बी. शहाणे, सागर मोगले, पी. एम. साळवे, राहूल बोईनवाड, गजानन सोळंके, महिला पोलिस शिपाई माया पैठणे, बालाजी कच्छवे आदींनी केली. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ३८ हजारांची दारू जप्त
By admin | Updated: October 7, 2014 00:15 IST