प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाददेशात सर्वप्रथम नगरपालिका इंग्रजांनी स्थापन केल्या आहेत, असा समज आहे. परंतु इंग्रजांच्याही आधी १६६० पासून नगरपालिका औरंगाबाद शहरात अस्तित्वात होती. त्याकाळी नगरपालिकेस ‘बल्दिया’ म्हणत असत. आजच्या कॉर्पोरेटर ऊर्फ नगरसेवकांप्रमाणेच त्याकाळी ‘पुरेदार’ काम पाहत असत. याचे पुरावे इतिहास संशोधक डॉ. शेख रमजान यांच्या हाती लागले आहेत. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर बावन्न पुरे नि बावन्न दरवाजांमुळे प्रसिद्ध होते. औरंगजेबच्या काळापासून शहराच्या प्रशासकीय व्यवस्थेत ‘पुरेदार’ हे महत्त्वपूर्ण पद अस्तित्वात होते आणि पुरेदारांकडे आपल्या पुऱ्यांची देखभाल आणि देखरेख करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली होती. जनमताद्वारे निवडले गेलेले सध्याचे नगरसेवक आणि योग्य व्यक्तींची त्याकाळी होत असलेली नेमणूक या दोघांतील नेमणुकीत अर्थातच फरक होता; पण नेमणुकीचा अपवाद वगळल्यास तेव्हाचे पुरेदार, त्यांचे कार्य, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा याबाबतीत आजच्या नगरसेवकांत मोठ्या प्रमाणात साम्य दिसून येते. त्या काळी ५२ पुऱ्यांचे कार्य या पुरेदारांमार्फत बल्दिया औरंगाबादतर्फे केले जात असे. बल्दिया म्हणजेच आधुनिक नगरपालिका होय. बल्दिया औरंगाबादचे प्रमुख हे औरंगजेबच्या काळात आणि आसिफ जाह निजामच्या काळात कोणकोण होते याचे संशोधन होणे आवश्यक आहे. पुरेदाराचे कार्य मध्ययुगीन पुरेदारांचे कार्य हे त्यांच्या अपिलावरून स्पष्ट दिसून येते. त्यांना अनेक प्रकारचे कार्य करावे लागत असे. त्यांच्या मोहल्ल्यात घडणाऱ्या चांगल्या, वाईट गोष्टींची त्यांना दखल घ्यावी लागत असे. चोरांपासून मोहल्ल्यांचे संरक्षण व्हावे याचीही पुरेदारास खबरदारी घ्यावी लागत असे. मोहल्ल्यात जर भांडणे होत असतील तर ती सोडविणे व त्यावर वरिष्ठांकडून योग्य उपाययोजनाही करावी लागत असे. मोहल्ल्यातील लोकांनी जर कोर्टात किंवा कोतवालीत काही खटले, मुकदमे दाखल केले असतील तर त्याची दखल घेण्याची जबाबदारी पुरेदाराची होती. घरांची, जमिनीची खरेदी-विक्री पुरेदारांमार्फत होत होती. त्यांना मोहल्ल्यात होणाऱ्या लग्नकार्यात किंवा इतर सर्व प्रकारच्या समारंभात महत्त्वपूर्ण स्थान दिले जात असे. मोहल्ल्यातील साफसफाई, रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्याची जबाबदारी पुरेदारावर होती. दुर्मिळ अपीलपत्रच बनले ‘पुरेदार’चा पुरावा डॉ. शेख रमजान यांनी सांगितले की, माझ्याकडे पुरेदाराबाबतीत फारशी भाषेतील दस्तावेज हे २० जिलकद १२९८ हिजरी वर्षाचे (वर्ष १८७४) एक अपीलपत्र आहे. औरंगाबाद शहरातील जुना बाजार, चौक आणि सुलतानपुरा या वॉर्डांचे पुरेदार मोहंमद यासीन आणि मोहंमद रजा वडील शेख हामीद यांनी एकत्रितरीत्या तत्कालीन सरकार (निजाम) कडे अपील केलेले होते की, औरंगजेबच्या काळापासून त्यांच्या पूर्वजांपासून पुरेदार म्हणून होत असलेली सेवा ही काही कारणास्तव निजाम सरकारने थांबविण्यात आलेली आहे. ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी त्यांचे पुरेदारांचे हक्क त्यांना पूर्ववत बहाल करण्यात यावे. त्यांच्या अपीलपत्रात ते लिहितात की, ‘औरंगाबाद शहरातील थोर विद्वान लोक, मोठे मोठे अधिकारी, सावकार, व्यापारी आणि सब्जी विकणारे दुकानदार इ. सर्वांना आमच्याबद्दल माहिती आहे की, थोर बादशाह (औरंगजेब आलमगीर) यांच्या काळापासून आमच्याकडे वंश परंपरेने पुरेदारीचे कार्य सुरू आहे. पुरेदार म्हणून आम्ही मोहल्ल्यांची निगराणी आणि देखभाल रात्रंदिवस वंश परंपरागत आमच्या खानदानीत होत आहे.’यावरून पुरेदारीचे कार्य औरंगजेबच्या काळात औरंगाबाद शहरात अस्तित्वात होते यात शंकाच नाही. औरंगाबादच्या जुना बाजार, चौक आणि सुलतानपुरा या वॉर्डांकरिता दोन पुरेदार नेमलेले होते, हे सिद्ध होते. ५० पुरेदारांवर शहराच्या व्यवस्थेची जबाबदारी तीनशे वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचा विस्तार चिखलठाणा ते दौलताबादच्या हद्दीपर्यंत तसेच सातारा पर्वत पायथ्यापासून हर्सूलच्या पलीकडे काही मैलांपर्यंत होता. आजच्या महानगरपालिकेच्या क्षेत्राशी तुल्यबळ क्षेत्र त्याकाळी होते. काम करणारे सुमारे ५२ पुरेदार त्या काळी होते. जुन्या बाजारात पुरेदाराचे वंशजडॉ. शेख रमजान यांनी सांगितले की, वंश परंपरागत पुरेदारीचे कार्य चालत राहिल्यामुळे त्या कुटुंबातील लोकांचे आडनाव पुरेदार म्हणून कायम झाले. शहरात पुरेदरांचे वंशज जुना बाजार येथे आजही आहेत. त्यांना आजही पुरेदार या नावाने ओळखले जाते. पुरेदारांच्या या वंशजाकडून कळाले की, त्यांच्या घराण्यात औरंगाबाद शहरातील वेशीच्या दरवाजांच्या चाव्या आहेत. हे दरवाजे सायंकाळी नियमित बंद करणे आणि सकाळी उघडण्याची जबाबदारीसुद्धा पुरेदारांकडे देण्यात आलेली होती.
३०० वर्षांपूर्वीही औरंगाबादेत होती नगरसेवकांची परंपरा...
By admin | Updated: July 20, 2014 01:01 IST