नांदेड : नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत फोेटो नसलेल्या सुमारे २५ हजार ९६३ मतदारांना फोटो व माहिती जमा करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाने केले आहे़ २ एप्रिलपर्यंत फोटो, संबंधित माहिती जमा न करणाऱ्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा इशाराही देण्यात आला आहे़ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदारयाद्या शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत ८६ - नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात १५ हजार ८७७ आणि ८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात १० हजार ८६ मतदारांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट नाहीत़ अशा मतदारांच्या नावांची यादी तहसील कार्यालयातील मदत केंद्रात, महानगरपालिका व पंचायत समिती नांदेड येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे़ मतदार यादीत फोटो नसलेल्या संबंधित मतदारांनी तहसील कार्यालय नांदेड येथील मतदार केंद्रात २ एप्रिल २०१६ पर्यंत आपले फोटो जमा करावेत, अन्यथा या तारखेपर्यंत असे मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत, असे गृहीत धरून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे़ राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण कार्यक्रमामध्ये तसेच मतदारांची नावे विहित पद्धतीने मतदारयादीत समाविष्ट करण्याच्या अभियानांतर्गत स्वीप या अनुषंगाने महिला व युुवक तसेच वंचित समाज समूहातील विशेषत: तृतीयपंथी व्यक्तींची नावेही मतदार यादीमध्ये नोंदविता येणार आहेत़ त्यासाठी संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, सहाय्यक नोंदणी अधिकारी तथा नांदेडचे तहसिलदार पी़ के़ ठाकूर यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)
२५ हजार ओळखपत्रे छायाचित्राविना
By admin | Updated: March 29, 2016 23:53 IST