अजिंठा : अनाड रस्त्यावर व अजिंठा बसस्थानकावर फैसल कॉलनीत (११ केव्ही) खांबावरील विजेच्या तारा तुटल्याने जवळपास २० ते २५ ग्रामस्थांच्या घरातील विजेच्या मीटरचा स्फोट झाला, तर काहींच्या घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे, घरातील वायर जळाल्या. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजता घडली.अनाड रस्त्यावर विजेच्या खांबावर एक वानर धडकल्यामुळे तारा तुटल्या. पाहता-पाहता फैसल कॉलनीत सर्व खांबांवरील तारा तुटून पडल्या. ६० ते ७० घरांची छोटीसी लोकवस्ती आहे. सर्व घरातील मीटर जळाले. वीज कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप अब्बास खॉन पठाण, आमेरखॉन अजीजखॉन, ब्रिजेस मुकुंदन युजेस, नाजीम कुरेशी यांनी केला आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे घटनाजागोजागी विजेच्या तारा लोंबकलेल्या आहेत. विजेच्या तारांमध्ये झाडाच्या फांद्या घुसल्या आहेत. कर्मचारी फांद्या तोडत नाहीत, डीपी उघड्यावर आहे, वारंवार फ्यूज जातो, त्यामुळे कर्मचारी जाड फ्यूज तार टाकून मोकळे होतात. बारीक फ्यूज असती तर एवढी मोठी घटना घडली नसती. या घटनेमुळे सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अजिंठ्याचा वीजपुरवठा खंडित होता. थ्री फेज वीज नसल्याने पिठाच्या गिरण्या बंद होत्या.या प्रकरणी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता राजपूत यांनी सांगितले की, लाईनवर वानर पडल्यामुळे ही घटना घडली. हाय होल्टेजमुळे घरातील विजेची उपकरणे जळाली. त्यात कर्मचाऱ्यांचा दोष नाही. वीज कर्मचारी एन.डी. जाधव, बी.डी. साबळे, शेख जफर, एकनाथ बांगर, देवीदास जाधव, पंडितराव सोन्ने यांनी परिश्रम घेऊन वीजपुरवठा सुरळीत केला.
२५ वीज मीटरचा स्फोट
By admin | Updated: August 7, 2014 01:56 IST