जालना : आगामी काही आठवड्यांतच विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार असल्याचे संकेत असल्याने शेवटच्या वर्षात विकास कामांना प्राधान्य देण्याकडे जिल्ह्यातील पाचही आमदारांचा कल आहे. परतूरचे आमदार सुरेश जेथलिया यांनी गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात सर्वांत कमी म्हणजे ६ लाख ७६ हजार रुपये खर्च केले आहेत. तर सर्वाधिक खर्च जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी ७३ लाख ७० हजार रुपये केला. आमदारांना पाच वर्षांच्या काळात विविध विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी २ कोटींचा आमदार निधी मंजूर केला जातो.दरवर्षी मंजूर निधीच्या दीडपट नियोजन केले जाते. मात्र आता कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने यावर्षी एकपटीचेच नियोजन करण्यात आले आहे. विधानसभेची आचारसंहिता १५ आॅगस्टनंतर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या तीन आठवड्यांत राहिलेला निधी खर्च करण्याकडे सर्व आमदारांनी कंबर कसली आहे. काही आमदारांचा पूर्ण निधी या काळात खर्च होणे कठीण आहे. काही आमदारांनी नव्या कामांचे प्रस्ताव पूर्वीच दिलेले असून त्यातील काही कामे मार्गी लागत आहेत. (प्रतिनिधी)जेथलियांचा सर्वांत कमी तर गोरंट्याल यांचा सर्वाधिक खर्चआमदार निधीतून रस्ते, पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे, समाज मंदिर, व्यायामशाळा अशी अनेक कामे केली जातात. चालू वर्षी काहींनी पाणीपुरवठ्याच्या तर काहींनी पथदिवे, रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. तर आणखी काही प्रस्ताव येणे अपेक्षित आहेत. शंभर टक्के निधी खर्च व्हावा, यासाठी आमदारांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडे कामांचे प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यानंतर या दोन दिवसांत प्रस्ताव मोठ्या संख्येने दाखल करण्यात आले आहेत.
२५ टक्केच झाला खर्च
By admin | Updated: July 24, 2014 00:16 IST