दिनेश गुळवे , बीड जिल्ह्यातील ४० कापूस खरेदी केंद्रावर या हंगामात तब्बल २५ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. या कापसाला चार हजार ते पाच हजार शंभर रुपये दर मिळालेला आहे. बीड जिल्ह्यात खरिपाची पेरणी तब्बल पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर केली जाते. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. कापूस पिकामुळे बीड जिल्ह्यात शेतकर्यांचे जीवनमान उंचावले आहे. या पिकांतून शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने कापसाची ‘पांढरं सोनं’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या वर्षीही बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, परळी, केज, वडवणी या तालुक्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली होती. २०१३-२०१४ च्या हंगामात जूनमध्येच पाऊस पडल्याने कपाशीची लागवड योग्य वेळी झाली होती. यानंतरही वेळोवेळी पाऊस झाल्याने शेतकर्यांना कपाशीचे समाधानकारक उत्पादन मिळालेले आहे. यामुळे जिल्ह्यात यावर्षी खरेदीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. बीड जिल्ह्यात खाजगी कापूस खरेदी केंद्रासह सीसीआयकडून कापूस खरेदी करण्यात आली. यावर्षीच्या हंगामात आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्येच कापूस बाजारात आला होता. त्यामुळे यावेळीच जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रावर कापूस खरेदीस सुरुवात झाली. जिल्ह्यातील खाजगी ४० खरेदी केंद्रावर २५ लाख ४७ हजार ८७९ क्विंटल तर सीसीआयच्या दोन केंद्रावर १५ हजार १६६ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून देण्यात आली. या हंगामात कापसाला चार हजार ते पाच हजार शंभर दरम्यान भाव मिळालेला आहे. २०१२-१३ च्या हंगामात १७ लाख ५४ हजार ७६५ क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. यावर्षी कापूस उत्पादन वाढ झाल्याने खरेदीही वाढली आहे. गेल्या काही दिवसात बियाणांपासून खते, मजुरीसह इतर वस्तूंचेही दर वाढले आहेत. या तुलनेत कापसाचे दर मात्र वाढले नाहीत. यामुळे भाववाढीची मागणी होती. मात्र, असे असले तरी कापसाचा उतारा बर्यापैकी राहिल्याने शेतकर्यांना समाधानकारक उत्पन्न निघालेले आहे. सात हजार भाव मिळालाच नाही बियाणांसह इतर वस्तूंचे दर वाढल्याने कापसाला सात हजार रुपये दर मिळावा, अशी मागणी शेतकर्यांमधून होत होती. यासाठी लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाजही उठविला होता. तर, शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्ष यांनी आंदोलनेही केली होती. कापसाला सात हजार रुपये भाव मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र भाव मिळालाच नाही. तालुका खरेदी बीड २४८५४९ गेवराई ८१५३३६ माजलगाव ४४२३६५ वडवणी १०५९९८ परळी २४०२०७ आंबाजोगाई १७४२५ धारूर ३५६५५७ केज २४५१९९ कडा ७७२२३ काही कापूस गेला परराज्यात कापसाला ७ हजार रुपये भाव मिळावा या साठी आम्ही रास्ता रोको, उपोषण आदी आंदोलन केले. मात्र सरकारने कापसाला भाव काही वाढवून दिलाच नाही.याचा फायदा खाजगी कापूस व्यापार्यांनी घेतला. त्यांनी शेतकर्यांकडून कापूस घेऊन परराज्यात पाठविल्याचे कालिदास आपेट यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ४० केंद्रांवर २५ लाख क्विंटल कापसाची खरेदी
By admin | Updated: May 16, 2014 00:13 IST