उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरीच्या २४.३५ मिमी एवढा पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यात सर्वाधिक ३३.६० मिमी नोंद झाली आहे. सदरील पावसामुळे प्रकल्पांतील पाणीपातळीत फारसा फरक पडणार नसला तरी खरीप पिकांना मात्र, जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही. जिल्हाभरात मिळून आजवर ३०.५ टक्के एवढा पाऊस पडला आहे. अधून-मधून पडणाऱ्या या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळत असून पिकांची वाढही चांगली झाली आहे. परंतु, दुसरीकडे पाण्याचा प्रश्न तितकाच गंभीर आहे. जिल्हाभरातील शंभरावर प्रकल्पांमध्ये अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही पाणीसाठा झालेला नाही. चक्के हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. उर्वरित प्रकल्पांची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा दमदार पावसाकडे लागल्या आहेत. मागील चोवीस तासात म्हणजेच रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्हाभरात मिळून २४.३५ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद भूम तालुक्यात झाली आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळखलेल्या भूमध्ये ३३.६० मिमी पाऊस झाला आहे. त्यानंतर वाशी तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. २९ मिमी एवढी नोंद झाली आहे. दरम्यान, यंदा तुळजापूर तालुक्यावरही पावसाची चांगली कृपादृष्टी आहे. २८.७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यमानाचा विचार करता तुळजापूर तालुक्यात झालेल्या पर्जन्यमानाच्या टक्केवारीने चाळीशी ओलांडली आहे. तुळजापूर वगळता एकही तालुका चाळीशीही गोठू शकलेला नाही. परंडा तालुक्यातही २८.४० मिमी पाऊस पडला आहे. त्यानंतर उमरगा २४.४० मिमी, लोहारा १६.६७ मिमी, कळंब १७.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिना सरत आला असतानाही जिल्ह्याचा काही भाग वगळता, दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आजही जिल्हाभरातील विविध गावांत मिळून सुमारे २०९ टँकर सुरू आहेत. अधिग्रहणांची संख्याही एक हजारावर आहे. पाणीपातळी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांच्या नजराही आता आभाळाकडे लागल्या आहेत.
जिल्हाभरात २४.३५ मिली मीटर पाऊस !
By admin | Updated: July 25, 2016 00:36 IST