देशपातळीवर करोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेकडे शहरातील डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार २४ हजार लाभार्थींची नोंदणी झाली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत ५ हजार ४०० लाभार्थींचे लसीकरण झाले असल्याची माहिती मिळाली आहे. हे लाभार्थी पालिकेच्या हद्दीतील असून, ३७९ लाभार्थी घाटी रुग्णालयाशी संबंधित आहेत. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी लस घेण्यासाठी प्रतिसाद दिला, पण आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लसीकरणाचे प्रमाण कमी झाले आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. आतापर्यंतच्या ज्या कर्मचाऱ्यांनी लगेच घेतली त्यातील काहीजणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयाने त्यांना १५ ते २० हजारांपर्यंतचे बिल दिले आहे.
महापालिकेकडे पंधरा हजार लसींचा साठा
महापालिकेला शासनाकडून यापूर्वी वीस हजार कोविशिल्ड लसींचा पुरवठा करण्यात आला होता, आता पुन्हा पंधरा हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. लसींचा साठा उपलब्ध आहे. प्राप्त झालेल्या लसी दोन डोसचा विचार करून लाभार्थींना दिल्या जाणार आहेत.