विठ्ठल भिसे , पाथरीविनापरवाना वाळूसाठा ठेवल्या प्रकरणी पाथरी तालुक्यात २१ लाखांचा वाळूसाठा महसूल प्रशासनाने जप्त करून पोलिस कारवाई केली आहे़ यामध्ये वेगवेगळ्या तीन गुन्ह्यामध्ये सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ पाथरी तालुक्यात गोदावरी नदी पात्रात निवळी, मुदगल आणि विटा या तीन ठिकाणी अधिकृत वाळू उपस्याला टेंडर काढून परवानगी देण्यात आली होती़ परंतु, या तिन्ही ठिकाणी ठरवून दिलेल्या वाळूपेक्षा अधिक वाळुचा उपसा केला जात असल्याने आणि हद्दीच्या बाहेर वाळू उपसा करण्यात आल्याने महसूल प्रशासनाने हे तीनही वाळुचे ठेके बंद केली होती़ वाळू उपसा करीत असताना ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर वाळुचा जागोजागी साठा केला़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अवैधरित्या वाळूसाठा करणाऱ्यांविरूद्ध कारवाईची मोहीम जिल्हाभरात हाती घेण्यात आली आहे़ पाथरी तालुक्यात आठ दिवसांपूर्वीच ९५ लाख रुपयांचा वाळुसाठा डाकू पिंप्री शिवारामध्ये जप्त करण्यात आला होता़ त्यानंतर बाभळगाव, कानसूर आणि विटा बु़ सज्जाअंतर्गत वाळू साठे महसूल प्रशासनाने जप्त करून कारवाई केली आहे़ कानसूर सज्जा अंतर्गत तारुगव्हाण येथील गवळणबाई बाबुराव महात्मे यांच्या शेत गट नंबर ६९ मध्ये १३८ ब्रास वाळू ज्याची किंमत ४ लाख १४ हजार रुपये एवढी आहे़ अवैध वाळू साठा केल्यावरून या सज्जाचे तलाठी वसंत मारोतराव सत्वधर यांनी पाथरी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली़ या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसऱ्या एका घटनेत विटा बु़़ चे तलाठी प्रभावती प्रक्षिती अप्पा साखरे यांच्या फिर्यादीवरून मुदगल शिवारात गट क्रमांक ८६, ८४, १८८, १०२ शेतामध्ये १३५ ब्रास वाळू ज्याची किंमत ४ लाख ५ हजार रुपये आढळून आली म्हणून चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यामध्ये देवीदास लक्ष्मण शेळके (रा़ साखला प्लॉट, परभणी), वैजनाथ शिवाजी कराड (रा़ इंदेगाव, ता़ परळी), सुरेश गणपत फड (रा़परळी), सुरेश पांडूरंग जाधव (रा़ सारंगापूर, ता़ मानवत) यांचा समावेश आहे़ आणखी एका घटनेत बाभुळगावचे तलाठी राजकुमार रामराव चिकटे यांना लिंबा शिवारात शेत गट नंबर १६५, २४, १६७ मध्ये ४४० ब्रास वाळू ज्याची किंमत १३ लाख २० हजार आढळून आली़ राजकुमार चिकटे यांच्या फिर्यादीवरून शेख रियाज शेख अमीन, शेख चिन्नू शेख नूर व दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलिस नायक यु़ के़ लाड करीत आहेत़ वाळू उपसा सुरूच...गोदावरी पात्रातील वाळुचे ठेके महसूल प्रशासनाने बंद केल्यानंतरही गोदाकाठच्या अनेक भागामध्ये वाळुचा अवैधरित्या उपसा सुरूच आहे़ पाऊस पडत नसल्याने उघडीच्या दिवसामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे चांगलेच फावले असून, महसूल प्रशासनाची नजर चुकवत रात्री वाळू उपसा केला जाऊ लागला आहे़ जागोजागी वाळूसाठेमहसूल प्रशासनाने तीन वाळू साठ्यांवर २१ लाख रुपयांची वाळू जप्त केली असली तरी गोदाकाठच्या अनेक भागामध्ये ठिक ठिकाणी वाळुचे साठे केलेले आहेत़ मुख्य रस्त्यालगत बिनदिक्कतपणे संबंधित ठेकेदारांकडून वाळुचे साठे केल्याचे चित्र गोदाकाठ परिसरामध्ये पहावयास मिळत आहे़ लिलावातही तेच ठेकेदारमहसूल प्रशासनाने जप्त केलेल्या वाळुचा कालांतराने लिलाव केला जातो़ लिलावामध्ये साठा करणाऱ्या ठेकेदारांची साखळी अगोदरच तयार राहत असल्याने पूर्वी ज्यांचे वाळुचे साठे होते तेच ठेकेदार पुन्हा लिलावामध्ये वाळुसाठा खरेदी करतात आणि ही खरेदीची प्रक्रिया संगनमतानेच केली जात असल्याने तुम्ही मारल्यासारखे करा आम्ही रडल्यासारखे करतो, अशी अवस्था या वाळु प्रकरणी झाली आहे़
२१ लाखांचा वाळूसाठा जप्त
By admin | Updated: July 18, 2014 01:44 IST