औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आता १० मेपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ३७७ पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. आणखी १ हजार ६५९ जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाला नोंदणीची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ४३५ विनाअनुदानित शाळांमध्ये जवळपास ५ हजार ३६ जागांवर ‘आरटीई’नुसार प्रवेश दिले जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्य मंडळाबरोबरच ‘सीबीएसई’, ‘आयसीएसई’, ‘आयबी’ अशा सर्व मंडळांच्या तसेच सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्ये समाजातील वंचित, आर्थिक दुर्बल घटक व अपंगांसाठी २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जाणार आहेत. दरम्यान, सुरुवातीला शाळांसाठी आणि त्यानंतर पालकांसाठी आॅनलाईन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, यासंबंधीचे ‘पोर्टल’ सतत ‘हँग’ होत राहिल्यामुळे शिक्षण विभागाने शाळांना आॅनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ दिली. त्यानंतर अलीकडे पालकांसाठी नोंदणी सुरू झाली. त्यानंतर ५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता १० मेपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत ‘आरटीई’ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिला असला तरी अनेक शाळांनी पळवाटा शोधल्या आहेत. जेव्हा पालक आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संबंधित संकेतस्थळावर जातो, त्यावेळी ‘पोर्टल’वर अपेक्षित शाळा दिसत नसल्याने नाईलाजाने पालकांना स्क्रीनवर दिसणाऱ्या शाळेला प्राधान्य देण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.
१६५९ जागा रिकाम्याच
By admin | Updated: May 6, 2016 23:59 IST