कोरोना व्यवस्थापनासाठी ४ हजार कोटी खर्च
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्यवस्थापनासाठी राज्याने ४ हजार कोटी रुपयांचा खर्च केला आहे. महामारीशी निपटण्यासाठी केंद्र सरकारने कोणतीही मदत केलेली नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. जूनपूर्वी १,२०० कोटी तर त्यानंतर २,८०० कोटी रुपये खर्च करण्यात आले.
विघटनवादी शक्तींचा प्रवेशाचा प्रयत्न
हैदराबाद : विघटनवादी शक्ती हैदराबादेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री व पक्षप्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी केला. अशांतता निर्माण करणाऱ्या शक्तींना तुम्ही प्रवेश देणार का? येथील शांतता भंग करणार का, असा सवालही त्यांनी केला.
पाकमधील गोळीबारात ८ जण ठार
पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पश्तूनख्वा प्रंतात जमिनीचा वाद सोडविण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत झालेल्या गोळीबारामध्ये आठ जण ठार झाले. माजी आमदाराच्या घरासमोर दोन गट भिडल्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बालाजीसाठी लवकरच इलेक्ट्रिक बस
तिरुपती : तिरुपती बालाजीला जाण्यासाठी लवकरच इलेक्ट्रिक बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बालाजीच्या पर्वतीय भागांमध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचाच हा भाग आहे.
झारखंडमध्ये नक्षलींशी चकमक
चायबासा (झारखंड) : सुरक्षा दल व नक्षलींमध्ये पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात चकमक उडाली. मनमारू जंगलात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. सुरक्षा दलांनी जोरदार गोळीबार केल्यानंतर नक्षलींनी घटनास्थळाहून पलायन केले. नक्षलींचा शोध सुरू आहे.
बायडेन यांचा जग आदर करील
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जो बायडेन यांचा जग आदर करील, असा विश्वास निर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी म्हटले आहे. बायडेन हे संपूर्ण अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतील, असे त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.
१०० कोटींची जमीन केली मुक्त
भोपाळ : भोपाळ रेल्वेस्थानकाजवळील १०० कोटी रुपयांची २०,००० वर्ग फूट जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली. या जागेवर उभारण्यात आलेली ४५ बेकायदेशीर दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. येथे अवैध व्यवसायही चालत असल्याची माहिती पुढे आली होती.