कळंब : कळंब तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना चार महिन्यांपासून सवलतीच्या दरातील साखरेचा कणही मिळालेला नसून, तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेंतर्गतच्या १६ हजार ६०० शिधापत्रिकावरील व्यक्ती या साखरेपासून वंचित राहिल्या आहेत. साखर कारखान्यांची मुजोरी व त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे गोरगरीब जनतेला साखर मिळणे दुर्लभ झाले आहे. त्यामुळे या शिधापत्रिका धारकांना तात्काळ साखर उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांना प्रतिमाह प्रतिमाणसी ५०० ग्रॅम या प्रमाणात साखरेचा पुरवठा केला जातो. ही साखर उपरोक्त शिधापत्रिकेवरील युनीटनुसार १३ रुपये पन्नास पैसे या सवलतीच्या दरात वितरित केली जाते. दरडोई साखरेच्या वापराच्या प्रमाणात प्रतिमाणसी मिळणारे साखरेचे प्रमाण कमी असले तरी गोरगरीब जनतेला या योजनेतून तेवढाच आधार मिळत होता. परंतु या गोड साखरेची कडू कहाणी झाली असून, साखर कारखानदारांची दंडेलशाही, प्रशासनाचा वचक नसल्याने वर्षातून काही ठराविक महिनेच ही साखर शिधापत्रिका धारकांच्या हातात पडत आहे. कळंब तालुक्यात पुरवठा विभागाचे दारिद्र्य रेषेखालील ११५६९ शिधापत्रिका नोंदणीकृत असून, या शिधापत्रिकावरील युनिटची संख्या ६०९४५ एवढी आहे. याशिवाय अंत्योदय योजनेत ५२५४ शिधापत्रिका असून, त्यावरील युनिटची संख्या २९६८९ एवढी आहे. या दोन्ही वर्गातील व्यक्तींना सवलतीच्या दरातील साखरेचा लाभ मिळतो. परंतु या १६८२३ शिधापत्रिकेवरील ९०६३४ व्यक्ती या साखरेपासून वंचित आहेत. चार महिन्याचा गोषवारा निरंक यासंदर्भात कळंब तहसीलमधील पुरवठा विभागाकडे अधिक चौकशी केली असता, चालू वर्षात केवळ जानेवारीमध्ये ४०० क्विंटल साखरेचा पुरवठा केला गेला. मात्र फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात कसलीही साखर प्राप्त झाली नाही. यामुळे सदर लाभधारक साखरेपासून वंचित राहत आहेत. ४५० क्विंटलची आवश्यकता तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेच्या १६८२३ शिधापत्रिकावर जवळपास ९० हजार युनीट आहेत. प्रतिमाणसी ५०० ग्रॅमप्रमाणे या शिधापत्रिकासाठी प्रत्येक महिन्याला ४५० क्विंटल साखरेची आवश्यकता भासते. परंतु साखर एक तर येत नाही अन् आली तर वरीलप्रमाणे येत नसल्याने सर्व स्वस्त धान्य दुकानांना व ग्राहकांना ती पुरवता येत नाही. (वार्ताहर) साखर कारखानदारांची मुजोरी यासंदर्भात ज्या कारखान्यांना साखर पुरवठा करण्यासंदर्भात आदेश दिला जातो. त्या कारखान्यांकडून साखर देण्यास टाळाटाळ केली जाते. तसेच नॉमिणीलाही संबंधित कारखाना व्यवस्थापन साखर देणे बंधनकारक असताना नॉमिनीला अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत. यामुळेच शासनाच्या या चांगल्या योजनेचा फज्जा उडत असल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भात काही कारखान्यांच्या नावे साखरेचे अलॉटमेंट झालेले आहे. परंतु साखर कारखानदार साखर देत नसल्याने शिधापत्रिकाधारकांना साखर पुरवठा करताना अडचण येत आहे. यासंदर्भात आम्ही वरिष्ठांना वेळोवेळी अहवाल सादर केला असल्याचे तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले. साखरेचा पुरवठा करावा आमची साखर कशी आली नाही म्हणून सर्वसामान्य शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य दुकानदारांना विचारणा करतो. दुकानदार त्यांना वरुन आली नाही असे सांगतात. साखरवरुन आली नाही चक्र नेहमीच ग्राहकांच्या नशिबी येत असून, चार महिन्यापासून त्याना कसलीही साखर मिळाली नसल्याने खुल्या बाजारातून चढ्या दराने साखर घ्यावी लागत आहे. याकडे ना लोकप्रतिनिधीचे लक्ष आहे ना गावपुढार्यांचे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ साखर उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे. नॉमिनी म्हणतात ‘अलॉटमेंट’ नाही यासंदर्भात कळंब येथील नॉमिनी गणेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी एप्रिल ते मे या दोन महिन्याचे अलॉटमेंंट झाले नसल्याचे सांगितले. प्रत्येक तालुक्यात साखर पुरवठा करण्यासाठी काही नॉमिनीची नेमणूक केलेली असते. या नॉमिनीस पुरवठा विभागाकडून साखर कोणत्या कारखान्यांकडून उचलायची यासंदर्भात आदेश मिळतात. त्यानुुसार नॉमिनी कारखान्याकडून साखर उचलून स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करतो. परंतु साखर कोठून आणायची याचे निश्चित आदेश नसल्याने नॉमिनी पुरवणार तरी कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.
१६ हजार ६०० शिधापत्रिकाधारक वंचित
By admin | Updated: June 5, 2014 00:48 IST