कळंब : तुळजाभवानी दूध संघ बंद पडल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबतच कर्मचारीही अडचणीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे मागील २५ महिन्यांपासून वेतन रखडले आहे. शेतकऱ्यांचेही १६ लाख रूपये थकित आहेत. शेतकऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांकडून हक्काच्या पैशासाठी लोकप्रतिनिधी व संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नसल्याचे कर्मचाऱ्यांतून सांगण्यात येत आहे.एकेकाळी मराठवाड्यामध्ये अग्रेसर असलेल्या तुळजाभवानी दूध संघामध्ये प्रतिदिन ७० ते ८० हजार लिटर दूध संकलन होत होते. या संघामध्ये ६९ कर्मचारी, अधिकारी कार्यरत होते. परंतु, मध्यंतरीच्या काळात खवा भट्ट्या आणि खाजगी दूध संकलन केंद्रांचे जाळे विस्तारत गेल्याने या संघाला घरघर लागली. त्यामुळे आजघडीला हा संघ डबघाईला आला आहे. संघाकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल १६ लाख रूपये थकित आहेत. त्याचप्रमाणे ६९ कर्मचाऱ्यांचे २५ महिन्यांचे वेतन थकित आहे. हा प्रश्न लक्षात घेवून सदरील संघ खाजगी कंपनीला चालविण्यास देण्याबाबात चर्चा सुरू झाली होती.त्यामुळे कर्मचाऱ्यांसोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, संचालक मंडळीचे कुठल्याही कंपनीच्या नावरवर एकमत झाले नाही. त्यामुळे हाही पर्याय बारगळला. त्यामुळे दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लोटूनही संबंधित शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकले नाहीत. संघाकडील पैशासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, जिल्हाधिकारी आणि उपनिबंधक कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याची संतप्त प्रतिक्रया कर्मचारी व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)तुळजाभवानी दूध संघाकडून दूध उत्पादकाचे १६ लाख, वाहतूक ठेकेदाराचे १२ लाख तसेच तीन वर्षापासूनचे कर्मचाऱ्यांचे प्राव्हीडंट फंड, गॅ्रच्युएटी, कर्मचारी पतसंस्था कर्ज व्याजासह कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करून घेण्यात आलेले आहेत. ही रक्कम एक कोटी रूपयांच्या आसपास असल्याचे कर्मचारी सांगतात. ही रक्कम संघाने संबंधितांकडे वर्ग करणे अपेक्षित आहे.कर्मचाऱ्यांसोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांनीही मंत्र्यांपासून ते विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविले आहेत. परंतु, यातील कोणीही हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच आजपर्यंत सदरील प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे. याबाबत कर्मचाऱ्यांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. उपासमारीची वेळ४तुळजाभवानी दूध संघाकडे ६९ कर्मचाऱ्यांचे ३५ महिन्यांचे वेतन थकित आहे. याबाबत वारंवार पाठपुरवा करूनही हा प्रश्न अद्याप मार्गी लागू शकला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी कर्मचारी जे. के. बारकूल यांनी केली आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे १६ लाख थकित !
By admin | Updated: August 25, 2014 01:37 IST