औरंगाबाद : ब्रिटनहून आलेल्या १३ नागरिकांचा शोध शनिवारीही लागत नसल्यामुळे महापालिकेने पोलिसांची मदत घेतली असून पोलिसांकडे १३ नागरिकांचे नाव व पत्त्यासह यादी सोपविली आहे. पासपोर्ट नंबरचा उपयोग करुन त्यांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
महापालिकेने ब्रिटनहून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान शहरात ब्रिटन येथून ४४ नागरिक दाखल झाले आहेत. त्यापैकी ३६ नागरिक महापालिका क्षेत्रातील असून त्यातील १३ नागरिकांचा संपर्क होत नसल्यामुळे त्यांना शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. १३ जणांच्या नाव व पत्त्यासह यादी पोलिसांकडे पाठविण्यात आली असून त्यांचा मोबाईल नंबर लागत नसल्यामुळे पासपोर्ट नंबरवरून त्यांच्या घरांचा पत्ता काढून पोलीस त्यांना शोधणार आहेत. त्यांचा शोध लागताच त्यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
चौकट,
चौघे निगेटिव्ह, सात जणांचे स्वॅब घेतले
ब्रिटन येथून आलेल्या चार नागरिकांची शुक्रवारी आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. शनिवारी त्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला. नांदेड येथे गेलेले चार जण आणि पुणे येथे गेलेला एक जण परत आला असून त्यांची शनिवारी कोरोना चाचणी घेण्यात आली. तसेच शहरात असलेल्या दोघांनीदेखील आरटीपीसीआर कोरोना चाचणी करुन घेतली. त्यांचा अहवाल उद्या रविवारी प्राप्त होणार आहे.
चौकट,
पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या अहवालाची प्रतीक्षा
ब्रिटन येथून आलेली ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. या महिलेच्या लाळेचा नमुना पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल प्राप्त होण्यास सात दिवस लागणार आहेत. या महिलेला धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.