लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीला २०१२ नंतर पूर्णपणे बंदी असतानाही या शिक्षकांची भरती करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली़ अशा जिल्ह्यातील ११० शिक्षकांची भरती बेकायदा झाल्याचा प्रकार समोर आला असून, त्यातील प्राथमिकच्या सहा शिक्षकांना सेवा समाप्तीचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिले आहेत़ राज्य शासनाने २०१२ नंतर शिक्षक भरतीला पूर्णपणे बंदी घातली होती़ तरीही राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये तसेच खाजगी अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यात आली़ या शिक्षकांना कायमस्वरुपी करून त्यांना वेतनही अदा करण्यात आले़ राज्य शासनाने या संदर्भात पडताळणी केल्यानंतर २०१२ नंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांची भरती बेकायदा ठरविण्यात आली़ संबंधित शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्याचे शिक्षण आयुक्तांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले़ त्यानुसार परभणी जिल्ह्यात माध्यमिकचे १०४ शिक्षक अनियमित असून, १० शिक्षकांची चौकशी करून योग्य वाटल्यास त्यांना सेवेत ठेवावे, अन्यथा त्यांचीही सेवा समाप्ती करावी, असे या आदेशात शिक्षण आयुक्तांनी म्हटले आहे़ या संदर्भात गेल्या महिनाभरात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली होती़ त्यानंतरचा अहवाल शिक्षण आयुक्तांना सादर केला़ असे असले तरी या १०४ शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने अद्यापही काढले नाहीत़ येत्या एक-दोन दिवसांमध्ये याबाबतचे आदेश निघण्याची शक्यता आहे़
११० शिक्षकांची बेकायदा भरती
By admin | Updated: June 6, 2017 23:50 IST