जालना : जालना जिल्ह्यात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस पडलेला नाही. पावसाअभावी पाणीपातळीही कमी होत आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयात फक्त ११ फूट पाणी आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून या जलाशयाचा बंद केलेला पाणी पुरवठा शुक्रवारपासून पुन्हा सुरु करण्यात आला आहे.जालना शहरात नवीन जालना भागाला मागील चार महिन्यापासून घाणेवाडी जलाशयातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यावेळी जलाशयात १४ फूट पाणी होते. मागील आठ दिवसांपासून नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे घाणेवाडीतील पाणीपुरवठा बंद होता. तसेच जायकवाडीतून होणारा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला होता. सध्या रमजान ईद व हिंदूंच्या पवित्र श्रावण महिन्यामुळे जालनेकरांना आठ दिवसांऐवजी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन नगर पालिकेने केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार घाणेवाडीचा पाणीपुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
घाणेवाडीत ११ फूट पाणी
By admin | Updated: July 26, 2014 00:41 IST