फोटो : एसीसी व नकोडा ग्रा.पं.ने बॅरिकेड्स लावून रहदारी अशी बंद केली
घुग्घुस : नकोडा-उसगाव रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापूर्वी सुरू केले. मात्र, अर्धवट काम करून काम बंद केले. त्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक १५ दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. त्याचा फटका शिंदोला, मुकुटबनकडे जाणाऱ्या एसटीला बसला असून त्या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
रस्त्याची अवस्था खराब असल्याने एसटी आगर चंद्रपूरने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होणार असल्याची सबब पुढे करून चक्क चंद्रपूर-घुग्घुस-मुंगोली, शिंदोला मार्गे मुकुटबन बस या मार्गावरून बंद करून नायगाव, चारगाव, शिरपूरमार्गे वळविण्यात आली. मात्र, मुंगोली, शिंदोला मार्गावरील अनेक गावांतील प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
नकोडा, उसगाव रस्त्याचे भूमिपूजन डिसेंबर १९ ला झाले. ठेकेदाराने खोदकाम सुरू केले. मात्र, काही प्रमाणात खोदकाम करून काम बंद केले. या रस्त्यावरून वेकोली वणी क्षेत्रातील मुंगोली, पैनगंगा, कोलगाव कोळसा खाण, एसीसी शिंदोला सिमेंट माईन्सच्या कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. त्याचबरोबरच कोरपना, राजुराकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याचे काम परत १५ दिवसांपूर्वी सुरू केले. त्यामुळे नकोडाकडून वाहतूक बंद केली. वाहनधारकांकडून आता एसीसी कारखाना व माउंट कारमेलच्या मध्यभागी असलेल्या रस्त्याचा उपयोग होत आहे. मात्र, त्या रस्त्यावरून कोळसा वाहतुकीचे ट्रक ये-जा करू नयेत म्हणून उंचावर एसीसीने बॅरिकेड्स लावले. त्यामुळे एसटी तिथून जाऊ शकत नाही.
९०० मीटरच्या कामापैकी सुमारे पाचशे मीटरचे काम पूर्ण झाले आहे. पुढील उर्वरित चारशे मीटरचे काम होळीपासून बंद आहे. ते काम त्वरित पूर्ण करून रहदारीसाठी मार्ग खुला करावा, अशी मागणी मुंगोलीचे उपसरपंच रुपेश ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.