कोरपना : तालुक्यात कोरोना रुग्णांची दिवसागणिक संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात जागा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक दायित्वातून सर्च फाउंडेशनतर्फे स्कॉलर्स सर्च अकॅडमी शाळेचे तीनशे खाटांचे वसतिगृह व सभागृह कोविड केअर सेंटरसाठी उपलब्ध करून देऊ, असा मनोदय सर्च फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष दिलीप झाडे यांनी कोरपना तहसीलदार यांची प्रत्यक्ष बोलून व्यक्त केला.
कोरपना शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार उपलब्ध होत नाही. रुग्णांना चंद्रपूर, नागपूर,वणी आदिलाबाद, मंचेरियल, कागजनगर, हैदराबाद येथील रुग्णालये गाठावे लागत आहे. तेथेही सर्व बेड फुल असल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी प्राणवायूयुक्त असे जंबो कोविड सेंटर तातडीने निर्माण करण्याची गरज आहे. त्या आनुषंगाने झाडे यांनी स्वत पुढाकार घेत तहसीलदार यांच्याशी चर्चा केली.
यावर तहसीलदार कोरपना सोमवारला स्कॉलर्स सर्च अकॅडमी सभागृह व वसतिगृह पाहणी करून आवश्यकतेनुसार अधिग्रहण करणार आहे.