चंद्रपूर: गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरच्या तापमानात वेगाने वाढ होत असून येत्या पाच दिवसांत विदर्भासह चंद्रपुरात उष्णतेची लाट येऊन धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवसांत दुपारच्यावेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा इशारा चंद्रपूर शहर महानगरपालिकेने दिला आहे. सध्या सर्वाधिक प्रखरतेने सूर्य आग ओकत आहे. शनिवारी ४४.८ तर रविवारी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथे करण्यात आली. सूर्य पृथ्वीच्या मध्यावर म्हणजेच विषववृत्तावर येत असल्याने पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहचत आहे. त्यामुळे सूर्यापासून आपला बचाव करण्यासाठी दुपारच्यावेळी कुणीही घराबाहेर पडू नये, असा सल्ला या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी दिला आहे. आगामी चार ते पाच दिवस सूर्य अगदी डोक्यावर येणार आहे. या बदलाला ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हणतात. (प्रतिनिधी)असे होतील दुष्परिणाम४कडक उन्ह असल्याने उष्माघात होण्याची शक्यता वाढते. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने प्रसंगी मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त पाणी प्यावे. या काळात डोळ्यांचे आजारही बळावण्याची शक्यता आहे. डोळे येण्याचे प्रमाणही वाढू शकते. ज्यांना हृदयविकार मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित तपासणी करीत रहावे. आहारामध्ये रसदार फळांचा वापर अधिक करावा तसेच मांसाहार करणे टाळावे.टोल फ्री १०८ क्रमांकावर आरोग्य सेवा४अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, ही उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघात झाल्यास मनपा आरोग्य केंद्र किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरीत औषधोपचार करून घ्यावा. तसेच १०८ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आकस्मीक आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, सभापती एस्तेर शिरवार यांनी केले आहे. उन्हामुळे मृत्यू का होतो ?४आपल्या शरीराचे तापमान नेहमी ३७ अंश सेल्सिअस असतं. या तापमानातच शरिरातील सर्व अवयव निट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सिअस तापमान कायम राखतं. सतत घाम निघत असताना पाणी पित राहणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी शरिरात इतरही अधिक महत्वाची कामं करतं. त्यामुळे शरिरातील पाण्याचा साठा कमी झाला तर शरीर घामाच्या रुपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं. जेव्हा बाहेरचे तापमान ४५ अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातील कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७ च्या पुढे जाऊ लागतं. प्रकृती गंभीर होऊन माणूस प्रसंगी दगावतो.
सावधान पुढील पाच दिवसांत उष्णतेची लाट
By admin | Updated: April 19, 2016 05:12 IST