चंद्रपूर : राज्यातील सुमारे १२ हजार रूग्ण अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. गरजूला अवयव मिळून त्यालाही सामान्य नागरिकाप्रमाणे जगता यावे, यासाठी राज्यशासन अवयव दानासाठी नागरिकांत जागृती करणार आहे. राज्यात एकाचवेळी राज्य ते तालुकास्तरापर्यंत महाअवयवदान अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाची सुरूवात ३० आॅगस्टपासून होत आहे. त्यामुळे अवयवदानासाठी प्रतिक्षेत असलेल्या रूग्णांना या अभियानातून नवसंजीवनी मिळणार आहे. रक्त आणि नेत्रज्ञानासाठी अनेक जण समोर येत असल्याने आज समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे अवदानाचीही चळवळ मोठ्या प्रमाणावर राबवून समाजाचा सहभाग वाढविण्यावर आता शासन प्रयत्न करणार आहे. जागतिक पातळीवर मृत्यूनंतर होणाऱ्या अवयवदानामध्ये भारतीय नागरिकांचा सहभाग अत्यल्प आहे. त्यामुळेच सामाजिक आणि कौटुंबिक जनजागृतीतून अवयवदानाबाबत आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान महाअवयवदान शिबिर राज्यभर घेण्यात येणार आहेत.जिवंत किंवा मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीचे जे अवयव निकामी झाले आहे, त्यांना अवयवदान करून नवजीवन देण्याचा हा प्रयत्न राहणार आहे. अवयवाचा पूर्ण किंवा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे काढून तो गरजवंतामध्ये प्रत्यारोपित करण्यात येतो. मेंदूस्तंभ मृत्यू झालेल्या रूग्णाचे साधारणत: सर्वच अवयव दान करता येऊ शकतात. सामान्य मृत्यूमध्ये केवळ डोळे आणि त्वचेचे दान तर जिवंतपणी केवळ मूत्रपिंड, यकृताचा काही भाग दान करू शकतो. हे अवयव केवळ जवळच्या नातेवाईकांमध्येच दान करू शकते. मस्तिकस्तंभ मृत्यूनंतर रूग्णालयातच अवयवनाचे दान होऊ शकते. अवयवदानानंतर मृत व्यक्तीचे शरीर सन्मानपूर्वक त्यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी परत दिले जाते. दान केलेले अवयव शासनाच्या नियमानुसार प्रतिक्षेतील गरजू रूग्णांनाच दिले जाते. यासाठी समन्वय समिती असून त्यांच्यामार्फत पारदर्शक पद्धतीने ही सर्व कार्यवाही होते. अवयव कोणत्या व्यक्तीला दिले आहे, याची माहिती अवयवदान करणाऱ्या नातेवाईकांना सांगितली जात नाही.एखाद्या जिवंत व्यक्तीवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेप्रमाणे अवयव काढल्या जातात. त्यामुळे दात्याच्या शरीरावर विद्रुपता येत नाही. शरीरावर, पोटावर आणि छातीवर शस्त्रक्रिया केल्याचे टाके मात्र राहतात. अवयवदानासाठी कोणताही मोबदला दिला जात नसल्याने हे शुद्ध आणि श्रेष्ठदान आहे. त्यामुळे अवयवदानाची इच्छा असलेल्यांनी संमतीपत्र, नातेवाईकांची परवानगी घेऊन नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)महाफेरीने अभियानाचा शुभारंभअवयव दानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या महाअवयवदानाची सुरुवात मंगळवारी सकाळी ८ वाजता जागृती महारॅलीने होणार आहे. ही रॅली सकाळी ८ वाजता वैद्यकीय महाविद्यालय येथून शुभारंभ होईल. ही महाफेरी रामनगर, जटपुरा गेट मार्गे गांधी चौक येथे विसर्जित होईल. रॅलीदरम्यान जनजागृतीपर पथनाट्य सादर केले जाणार आहेत.पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान१ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अवयवदानासाठी नोंदणी केलेल्यांचा व अवयवदान केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. अवयवदान अभियानात सक्रिय सहभाग घेतलेल्या आणि सहकार्य केल्याबाबत संबंधित डॉक्टर्स व कर्मचारी व सेवाभावी, समाजसेवी संस्था यांनाही प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.जनजागृतीसाठी विविध स्पर्धाबुधवार ३१ आॅगस्ट रोजी शहरातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता वादविवाद, चित्रकला व निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत क्रमांक पटकविणाऱ्याला पारितोषिके दिली जातील. १ सप्टेंबर रोजी अवयवदान अभियान नोंदणी शिबिर सकाळी ९ वाजता वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये होणार आहे. यामध्ये अवयवदात्यांचे अर्ज भरून घेणे, अवयवदात्यांना आॅनलाईन नोंदणीबाबत माहिती देण्यात येणार आहे.
१२ हजार रूग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: August 30, 2016 00:34 IST