नागभीड : येथील जनता कन्या विद्यालयात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रा. डाॅ. उमाजी हिरे यांच्या हस्ते रविवारी पार पडले.
यावेळी पं. स. सभापती प्रफुल्ल खापर्डे, जि. प. सदस्य संजय गजपुरे, न. प. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. विनोद मडावी, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. रवी गावंडे, कोविड केअर सेंटरचे डॉ. श्रीकांत कामडी, नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका मडावी, प्रभारी मुख्याध्यापक हरिश्चंद्र मेहेर उपस्थित होते. या लसीकरण केंद्रावर सर्वप्रथम विक्रम हिरे या २३ वर्षीय युवकाला अर्चना निखार या अधिपरिचारिकेने कोव्हिशिल्ड लस दिली. जिल्ह्यात २ मेपासून केवळ सात केंद्रांवर १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. नागभीड येथे सध्या यासाठी कोव्हिशिल्डच्या १४०० मात्रा प्राप्त झाल्या असून, दररोज २०० व्यक्तींचे लसीकरण केले जाणार आहे. नागभीड व परिसरात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची जागृती झाली असल्याने अवघ्या काही तासांतच आगामी सात दिवसांची ॲानलाईन नोंदणी फुल्ल झाली आहे. ॲानलाईन नोंदणी केलेल्यांनीच दिलेल्या तारीख व वेळेत केंद्रावर येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी केले आहे.