चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे सेनेची भाजपला साथ, पण उद्धव ठाकरेंना कल्पना होती का? पडद्यामागे काय-काय घडलं? संदीप गिऱ्हेंनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:31 IST2026-02-11T19:30:46+5:302026-02-11T19:31:16+5:30
..पण या संपूर्ण प्रक्रियेत उद्धव ठाकरे कुठे होते? पडद्यामागे नेमके काय काय घडले? यासंदर्भात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदिप गिऱ्हे यांनी सविस्तर भाष्य केले आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे सेनेची भाजपला साथ, पण उद्धव ठाकरेंना कल्पना होती का? पडद्यामागे काय-काय घडलं? संदीप गिऱ्हेंनी सगळंच सांगितलं
'दैव देतं अन् कर्म नेतं' ही म्हण चंद्रपूरमध्ये काँग्रेसला तंतोतंत लागू होताना दिसून आली. चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस सत्तेजवळ पोहोचली खरी, पण, पक्षांतर्गत मतभेत दूर करता करता आणि नंतर बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्याची जुळवता जुळव करता करता पक्षाची पुरती दमछाक उडाली आणि हाता-तोंडाशी आलेली सत्ता निसटली. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला साथ दिली आणि भाजपचा महापौर झाला. तर शिवसेनेला उपमहापौरपद मिळाले.
पण या संपूर्ण प्रक्रियेत उद्धव ठाकरे कुठे होते? पडद्यामागे नेमके काय काय घडले? यासंदर्भात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदिप गिऱ्हे यांनी सविस्तर भाष्य केले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याचा निर्णय कळवला होता, असे गिऱ्हे यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना गिऱ्हे म्हणाले, "निवडणुकांपूर्वी आणि नंतरही काँग्रेस पक्षाकडून वारंवार-वारंवार ज्या पद्धतीने अपमान होत होता, हे आम्ही, वरून देसाई साहेब आणि सुषमा ताई यांच्या माध्यमाने उद्धवजींपर्यंत पोहोचवले होते. संजय राऊत साहेब आमचे मोठे नेते आहेत. काल आमचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र आमचे संपर्क प्रमुख मुंबईहून येथे आले होते. तसेच, वरून सरदेसाई हे प्रत्येक क्षणाला माझ्या संपर्कात होते. सुषमा ताईही संपर्कात होत्या. त्यांना मी संपूर्ण परिस्थिती समजावून, हा मेसेज उद्धवजींपर्यंत पोहोचवला होता. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हा निर्णय घेतला."
कारण शेवटी, पक्ष टिकायला हवा, कार्यकर्ता टिकायला हवा. त्यासाठीच ही भावना होती. मला विश्वास आहे की, आमचे पक्षप्रमुख असोत किंवा संजय राऊत साहेब असोत, आमच्या कार्यकर्त्यंच्या भावना समजून घेतील आणि पक्षाला काल जे उपमहापौरपद मिळाले, उद्या स्टँडिंग कमिटीचे पदही शिवसेनेकडे राहणार आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मातोश्रीवर जाऊन आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत," असेही संदिप गिऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
...अन् भाजपनं महापौरपद खेचून आणंल -
खरे तर, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिस्तबद्ध मतदानाची रणनीती आखली. मतदानाआधी भाजपने जारी केलेला व्हीप महत्वाचा ठरला. भाजपा आणि शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी एकजुटीने मतदान करत महापौरपद भाजपाकडे खेचून आणले. उपमहापौरपद उद्धवसेनेला देऊन सत्तेत सहभागी करून घेण्याची भाजपाची रणनीती यशस्वी ठरली.
असं झालं सत्तेचं वाटप -
आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, पहिले सव्वा वर्ष महापौर भाजपाचा असेल, नंतरचे सव्वा वर्षे महापौर उद्धवसेनेचा असेल.
उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे म्हणाले की, "काँग्रेस आम्हाला शेवटच्या वर्षातही महापौर द्यायला तयार नव्हती. त्यामुळे आम्हाला भाजपासोबत जावे लागले. नंतरच्या सव्वा वर्षात महापौर उद्धवसेनेचा असेल. पाच वर्षे उपमहापौर उद्धवसेनेचा असेल. स्थायी समितीही पहिले एक वर्ष आणि शेवटचे एक वर्ष उद्धवसेनेकडे असेल", अशी माहिती गिऱ्हे यांनी दिली.