आरोपीला अटक : गळा दाबून केले ठारचिखलपरसोडी: नागभीड तालुक्यातील मौजा पांजरेपार येथील एकनाथ भाऊराव उरकुडे यांच्या शेतातील जळलेल्या तणसाच्या ढगात अर्धवट जळलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणीची ओळख पटलेली असून सदर तरुणी किरमीटी मेंढा येथील सुषमा रतीराम लोणारे (१९) असून तिच्या आतेभावानेच गळा दाबून हत्या केली व नंतर जाळल्याचे स्पष्ट झाले आहे.शुभम राजेंद्र गेडाम (२४) रा. पांजरेपार असे आरोपीचे नाव आहे. शुभम आतेभाऊ असल्याने नेहमी, किरमीटीला सुषमाच्या घरी जात असायचा. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सुषमा ही बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थीनी असून ब्रह्मपुरी येथे शिकत होती. सुषमाचे वडील रतीराम लोणारे यांचे पाच वर्षापूर्वीच आजाराने निधन झाले. आई सुषमा व लहान बईन विशाखा असे तिघे जण कुटुंबात होते. रविवारी सकाळी ११.३० वाजता सुषमाला एक फोन आला. त्यानंतर घरून पाचशे रुपये घेऊन सुषमा घराबाहेर पडली. दरम्यान, आरोपी शुभमने सुषमाला दुचाकीवर बसवून आपल्या गावच्या शेतशिवारात आणले.. एकनाथ भावराव उरकुडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली बसले. लग्नावरुन सुषमाचे आणि शुभमचे भांडण झाले. उत्तर तपासणीच्या अहवालावरून सुषमा अडीच महिन्याची गर्भवती असल्याचे समजते. याच कारणावरुन दोघांमध्ये भांडण झाले. राग अनावर झाल्याने शुभमने स्कार्पने सुषमाचा गळा दाबला व ठार केले. आपले काळे कृत्य लपविण्यासाठी जवळच असलेल्या तणसाच्या ढगामध्ये पेटवून दिले. (वार्ताहर)
सुषमाचा मेहुण्यानेच केला घात
By admin | Updated: May 6, 2016 00:58 IST