लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील डॉ. पी. संगिता व डॉ. निशीकांत टिपले यांनी एका ५५ वर्षीय कोरोना रूग्णावर मंगळवारी प्लाज्मा थेरीपीचा यशस्वी प्रयोग केला. विशेष म्हणजे, थेरेपीनंतर पाच तासाताच रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. जिल्ह्यातील पहिलीच यशस्वी प्लाज्मा थेरीपी असल्याचा दावाही डॉ. निशीकांत टिपले यांनी केला आहे.सरकारनगर येथील डॉ. पी. संगीता व डॉ. टिपले यांच्या कोविड रूग्णालयात चार दिवसांपूर्वी ५५ वर्षीय कोरोना बाधित उपचाराकरिता दाखल झाला होता. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी असल्याने ऑक्सिजनयुक्त बेडवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रूग्णाच्या कुटुंबीयांनी व्हेंटीलेटर बेड्स मिळावे, यासाठी अन्यत्र धावपळ सुरू केली. दरम्यान, डॉ. निशीकांत टिपले यांनी या रूग्णावर प्लाज्मा थेरीपी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चंद्रपूर शासकीय महाविद्यालय व रूग्णालयातून प्लाज्मा घेण्यात आला. या रूग्णावर प्लाज्मा थेरीपी करण्यात आली. त्यानंतर पाच ते आठ तासांच्या आत रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. येत्या आठवडाभरात रूग्ण पूर्णपणे बरा होईल, असा विश्वास डॉ. निशीकांत टिपले यांनी व्यक्त केला आहे. या थेरीपीसाठी डॉ. शिल्पा टिपले, डॉ. तोतडे, डॉ. हर्षल डॉ. साई, डॉ. सिद्धी आदींनी मोलाचे सहकार्य केले.
चार दिवसांपूर्वी ५५ वर्षीय रूण कारोनाच्या उपचाराकरिता आमच्या रूग्णालयात दाखल झाला होता. रेमडेसिविर इंजेक्शन देऊनही रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आम्ही प्लाज्मा थेरीपी करण्याचा निर्णय घेतला. प्लाज्मा थेरीपी केल्यानंतर रूग्णाच्या प्रकृतीत मोठी सुधारणा दिसून येत आहे.-डॉ. निशीकांत टिपले, चंद्रपूर
काय आहे प्लाज्मा थेरपी?कोरोना विषाणूला हरवून जी सुदृढ झाली आहे. त्या व्यक्तीचे रक्त इतर रूग्णांचे जीव वाचवू शकते. एखादा विषाणू शरीरात शिरला की आपले शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करते. विषाणू आणि आपल्यात होणाऱ्या या लढाईत आपले सैनिक म्हणजे अॅन्टीबॉडीज होय. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपले शरीर विशिष्ट प्रकारच्या अॅन्टीबॉडीज तयार करतात. या अॅन्टीबॉडीज रक्तातल्या प्लाज्मामध्ये असतात. कोविडमुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अॅन्टीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात सोडल्या जातात.