चंद्रपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील कोविड केअर सेंटर, खासगी व सरकारी कोविड रुग्णालयात पाय ठेवण्यासाठीही जागा नाही. कोरोना रुग्णाच्या घरी विलगीकरणाची सोय असेल त्याला कुठलेही लक्षणे नसतील तर त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात येते. मात्र त्यासाठी एका खासगी डॉक्टरांच्या सहीने अर्ज भरावा लागतो. परंतु, या अर्जावर सही करण्यासाठी डॉक्टरांकडून चक्क हजारो रुपयांची मागणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. परंतु, रुग्णाजवळ पर्याय नसल्याने त्यांनाही पैसे द्यावे लागत आहे. एकीकडे काही शहरात वैश्विक महामारीत रुग्णसेवा करण्यासाठी खासगी डॉक्टर सरकारी रुग्णालयात सेवा देत आहेत. परंतु, चंद्रपुरात काही खासगी डॉक्टरकडून संधीचा फायदा घेत रुग्णांना लुटण्यात येत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
बॉक्स
गावतुरे दाम्पत्यांनी जपली माणुसकी
चंद्रपूर येथील डॉ. अभिलाषा गावतुरे व डॉ. राकेश गावतुरे यांनी गरजूंना गृह विलगीकरणासाठी लागणाऱ्या अर्ज भरुन घेण्यासाठी तसेच त्याची देखरेख घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत सोशल मीडियावर मेसेज पसरताच शहरातील अनेक गरजू त्यांच्याकडून अर्ज भरुन घेत आहेत. हे दाम्पत्य मोफत सेवा देत आहे. शहरातील इतर डॉक्टरांनी असाच पुढाकार घेणे गरजेचे आहे.