वरोरा :पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत येणाऱ्या यवती पारधी टोला परिसराच्या जंगलात मोह फुलापासून दारू करीत असल्याची माहिती वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास मिळाली. त्या ठिकाणी धाड टाकून सात लाख ४० हजार रुपये किमतीची मोह फुल दारू व साहित्य जप्त केले.
याप्रकरणी सहा व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीवरून धाड टाकली असता, अनिल नीळकंठ मालवे, नीलेश नीळकंठ मालवे, दिनेश विठ्ठल पवार, विठ्ठल हरिलाल पवार, चंद्रभान मनोर भोसले, सुनील जय चंद्रपवार यांच्याकडून मोह सडवा, दारू, भट्टी साहित्य असा सात लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला व सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, सहायक फौजदार विलास बल्की, राजेश वराडे, रणधीर मेश्राम, किशोर बोर्डे, दिलीप सुर, अमोल नन्नावरे, कपिल भंडारवार, दिनेश मेश्राम आदींनी केली.