दुर्गापूर: इरई नदीतून रेतीचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची वाहतूक करताना किटाळी गावाजवळ पाच ट्रॅक्टर व तीन मिनीट्रक, अशा आठ वाहनांना दुर्गापूर पोलिसांनी पकडले. याप्रकरणात चालकांसह १२ जणांना व मालकांना अटक करुन २१ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईने रेती वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे.किटाळी गावालगत इरई नदी आहे. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून येथून रेती चोरीचा सपाटा सुरु आहे. पोलीस व पटवाऱ्यांद्वारे अनेकदा रेती चोरट्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मात्र या कारवाईला न जुमानता येथे अवैध रेती उत्खनन सुरुच होते. शनिवारी सकाळी ९ वाजता परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत फसके, ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत चंदे व कैलास खोब्रागडे यांनी किटाळी गावाजवळ तब्बल पाच ट्रॅक्टर व तीन मिनीट्रक अशा आठ वाहनांना रेती चोरुन नेत असताना रंगेहात पकडले. सदर वाहनात एकूण एक हजार १०१ घनफूट रेती होती. याची एकूण किंमत १६ हजार ५०० रुपये आहे. वाहनासह एकूण २१ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या वाहनाचे मालक वर्गीस तंबी, भूषनारायण तिवारी, विनोद थेरे, मल्लेश रेवल्लीवार, चालक भास्कर मेश्राम, नरेंद्र कोहळे, गोवर्धन यादव, नागेश गेडाम, प्रशांत देहगावकर, संजय उके, संजय भांडेकर, सचिन निकोडे यांना अटक केली आहे. (वार्ताहर)
रेतीची अवैध वाहतूक करताना पकडले
By admin | Updated: February 7, 2015 23:21 IST