आवाळपूर : जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल तालुका म्हणून कोरपनाची ओळख आहे. त्यातच आवाळपूर - नांदाफाटा परिसर औद्योगिक दृष्टीने प्रगत होत चालला आहे. या परिसरात आता रेती तस्करीला उधाण आले आहे.
परिसरात अनेक नाले असून, त्यात चांगल्या दर्जाची रेती आहे. ही रेती बांधकामासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. पैनगंगा नदीवरील सांगोडा, कारवाई घाट या नदीवरून व धामणगाव, आसन, नांदा, कढोली, कोल्हापूर गुडा, अंतरगाव या नाल्यावरून अवैध रेती वाहतुकीचा अवैध धंदा केला जातो.
भरदिवसा अवैध रेती तस्करी केली जाते. मात्र याकडे प्रशासनाची नजर जात नाही, ही आश्चर्याची बाब आहे. अवैध रेती तस्कारांसोबत अधिकारीवर्गाचे साटेलोटे तर नाही ना, अशी चर्चा परिसरात आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असला तरी अधिकाऱ्यांचे खिसे मात्र गरम होत आहे. एक दोन कारवाया सोडल्या तर इतर ठिकाणी हा व्यवसाय राजरोस सुरू आहे.
बॉक्स
अवैध रेतीसाठा
परिसरात अनेक ठिकाणी अवैध रेतीसाठा असल्याचे दिसून येत आहे. याकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. या रेतीसाठा अवैध आहे की वैध हेदेखील तपासून पाहणे गरजेचे आहे.
कोट
रेती तस्करी ही बाब नित्याची आहे. मागील वर्षी लिलाव न झाल्याने एक ब्रास रेती ८ ते ९ हजार रुपयांत विकल्या गेली. शासकीय कामात चोरीच्या रेतीचा वापर होतो. महसूल अधिकार्यांची साथ असल्याने तक्रारी करूनही कारवाई होत नाही. रेती तस्करी थांबविणे महसूल प्रशासनाच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे दिसत आहे.
-अभय मुनोत, ग्रामपंचायत सदस्य, नांदा
परिसरात अशा प्रकारे अवैध रेती साठवणूक केली जात आहे.