चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त ५० क्विंटल शेतमालाची आवक सुरू आहे. कापड व अन्य वस्तूंचे व्यवहार पूर्णत: ठप्प आहेत. पुढील १५ मेपर्यंत नुकसानीचा आकडा आणखी पुगण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोनाबाधित व मृतांची संख्या धडकी भरविण्यापर्यंत वाढल्याने पुढील भयानक धोका टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार अशंत: लॉकडाऊन सुरू झाले. गतवर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन न करता जीवनाश्यक दुकानांच्या वेळाही बदलविण्यात आल्या. किराणा, भाजीपाला, मेडिकल व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या बंदचा कोरोना संसर्गावर काय परिणाम झाला, याचे मूल्यमापन जिल्हा प्रशासनाकडून केले जाईल. परंतु, बंदमुळे कोरोनाबाधित व मृतकांच्या वाढत्या संख्येला अद्याप ब्रेक बसला नाही. बाधितांची संख्या सुमारे दीड हजार ते दोन हजार, तर मृतांची संख्या २५ ते २८ दरम्यान असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही थोडी अस्वस्थता आहे. निर्बंधामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बाजाराला मोठा फटका बसला. जिल्ह्यात सुमारे पाच कोटींचे नुकसान झाल्याचा दावा व्यापारी संघटना करीत आहेत.
शेतमाल खरेदी-विक्री विस्कळीत
जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद आहेत. शेतमाल खरेदी करणाऱ्या बाजार समित्यांच्या व्यवहारही ठप्प असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. बाजारात मागणीच नसल्याने माल घेऊन काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. ऐन खरीप हंगामाचे नियोजन सुरू असताना निर्बंध लागू झाले. त्यामुळे कृषी क्षेत्राला जबरदस्त फटका बसण्याची भीती आहे.
भाजीपाला व फळ बाजारातही निराशा
चंद्रपुरातील कृषी उत्पन्न बाजारात समितीत निर्बंधापूर्वी दररोज दाेन हजार क्विंटलपेक्षा जास्त शेतमालाची आवक सुरू होती. आता ती ५० क्विंटलवर आली. महात्मा जोतिबा फुले भाजीपाला बाजारात दररोज एक हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक कमी झाली. फळ बाजारात दररोज होणारी दोन क्विंटल फळांची आवक आता ५०० क्विंटलवर आली. त्यामुळे अनेकांनी दुकाने बंद ठेवली आहेत.
कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, तरीही बंदला पाठिंबा
चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील कापड, तसेच अन्य विविध वस्तू व्यावसायिकांचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प आहेत. जिवंत राहिल्यास उद्याही व्यवसाय करता येईल, या आशेपोटी व्यापाऱ्यांनी सरकारच्या कोरोनाविरुद्ध मोहिमेला पाठिंबा दिला. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. पण, सुमारे पाच कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने व्यापाऱ्यांना पॅकेज देण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सदानंद खत्री यांनी ‘लोकमत’कडे केली.
एमआयडीसीतील १५ टक्के उद्योग बंद
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर काही अटी लागू करून उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर एमआयडीसी क्षेत्रातील ८५ टक्के उद्योग सुरू आहेत. उद्योगांनी कामगारांची कोविड चाचणी केली. त्यामध्ये निगेटिव्ह आढळल्याने उत्पादनाला अडचणी नाहीत. केवळ १५ टक्के उद्योग बंद आहेत, अशी माहिती चंद्रपूर एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांनी दिली.