राजुरा : कोविड १९ या महामारीच्या काळात आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी अथवा कुटुंबातील सदस्यांकरिता शासकीय रुग्णालयात बेड आरक्षित ठेवण्यासह विमा कवच देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकार्यांना देण्यात आले.
प्राणाची बाजी
लावून कार्य करणाऱ्या या फ्रंटलाईन वर्कर्ससाठी शासनाने या मागण्यांच्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फत राज्याच्या आरोग्य संचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोविड १९ विषाणूमुळे सुरू झालेल्या जागतिक महामारीमध्ये आरोग्य कर्मचारी ‘फ्रंट लाइन वर्कर्स’ म्हणून रात्रंदिवस ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग फॉलोअप' व इतर सर्वेक्षण करतात. यामुळे त्यांनासुध्दा कोविडची लागण होऊ शकते. याकरिता या कर्मचार्यांना व त्यांच्या कुटुंबासाठी शासकीय रुग्णालयात राखीव बेड नसल्याने उपचाराअभावी प्रसंगी प्राण गमवावे लागतात. तसेच कुटुंबातील सदस्यांना गृह विलगीकरणात असताना शासकीय रुग्णालयातून औषधोपचार केले जात नाहीत. उलट तेथून परत पाठवतात. त्यामुळे आरोग्य कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचा सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी या रास्त मागण्या असून, त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिष्टमंडळात संघटनेचे पदाधिकारी अरुण कांबळे, मधुकर टेकाम, सुजित घोटकर, समर्थ, पत्तीवार, मांडरे, मेश्राम, सुरेश खाडे यांचा समावेश होता.