राजुरा : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार ॲड.वामन चटप यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र दिनी काळ्या पट्ट्या व काळे मास्क लावून निषेध नोंदविला.
चंद्रपूर जिल्ह्यातील व विदर्भातील संपूर्ण अकरा जिल्ह्यात व १२० तालुक्यात स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी काळ्या पट्ट्या व काळा मास्क लावून महाराष्ट्र दिनाचा निषेध केला आहे.
राजुरा येथील आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड.वामनराव चटप म्हणाले, चार वर्षे द्विभाषिक मुंबई राज्यात राहून व साठ वर्षे महाराष्ट्रात मराठी राज्यात राहून, विदर्भाच्या वाट्याला सिंचनाचा अनुशेष, परिणामी शेतकरी आत्महत्या, नागपूर कराराप्रमाणे निधी व नोकरीत २३ टक्के वाटा न मिळाल्यामुळे आणि सर्व उद्योग पुणे, मुंबई, नाशिक, नवी मुंबई या औद्योगिक कॉरिडॉरमध्ये निर्माण केल्यामुळे विदर्भात निर्माण झालेला नक्षलवाद हा सोसीओ इकॉनॉमिक प्रश्न, त्यामुळे पोलीस, नक्षलवादी व समाजातील नागरिक यांच्यावर आलेले मृत्यूचे संकट, १०,३०० मेगावॅटपेक्षा जास्त वीज तयार करूनही विदर्भाच्या वाट्याला आलेले प्रदूषण व लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. कोरोनामुळे राज्यातील अर्थव्यवस्था मरणोन्मुख झाल्यामुळे विदर्भाचा सिंचन क्षेत्र व अन्य क्षेत्रातील अनुशेष कधीही भरून निघू शकत नाही, त्यामुळे विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय असल्याने, केंद्र सरकारने तत्काळ विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी केली. यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते रमेश नळे, नगरसेवक दिलीप देरकर, मधुकर चिंचोलकर, कपिल ईद्दे, नरेंद्र काकडे, बंडू देठे, पुंडलिक वाढई, बळीराम खुजे, सूरज गव्हाणे, वैभव अडवे, विकास कुंभारे, निखिल बोंडे यांच्यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.