तळोधी (बा) : दुर्गम भागात शेती व्यवसाय करणार्या कोहळी समाजातील विवाह संस्कारात वर पक्षाकडे जमिनीच्या सातबार्याला प्राधान्य दिल्या जात असल्यामुळे ज्यांच्या सातबार्यावर जमीन कमी आहे किंवा सातबारा कोरा आहे, अशांना कोहळी समाजात लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे या समाजातील उपवर मुले लग्नाविना असून इतर समाजातील मुलींशी लग्न करण्याची त्यांची तयारी असल्याची माहिती तळोधी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच वाढोणा येथील कोहळी समाजाचे प्रमुख विकास झोडे यांनी दिली. पश्चिम विदर्भात वास्तव्याला असलेल्या कोहळी समाजाने शेती व्यवसायात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले असून विवाहासारख्या प्रवित्र कार्यक्रमप्रसंगी लग्नपत्रिकेतील वेळेचे भान राखून घड्याळाच्या काट्याचे तंतोतंत पालन करून वेळेचे महत्व पाळणारा समाज म्हणून ओळख आहे व लग्न कार्यात तंतोतंत वेळेचे भान राखण्याची त्यांची सवय इतर समाजासाठीच नव्हे तर देशातील समस्त क्षेत्रातील व्यक्तींना आदर्श म्हणून जीवनात पालन करण्यास लावणारी आहे.या समाजाचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे अजुनही या समाजात हुंडा पद्धती रूजली नाही. समाजातील अनेक लग्ने हुंड्याविना जुळलेली आहेत. इतकेच नव्हे तर विवाहासाठी मुली बघतानासुद्धा ते वेळेचा अपव्यय करीत नाहीत. मुली बघायला निघालेली मंडळी एकाच फेरीतच माहित असलेल्या मुली बघुन निर्णय घेतात व लग्न जुळतात. असे अनेक वैशिष्टये असलेला समाज मात्र मुलगी देताना मुलाकडे असलेला शेत जमिनीचा सातबाराचा उतारा अवश्य बघतात. ते मुलाची संपत्ती त्याच्याकडील जमिनीवरच ठरवतात. ज्यांच्याकडे सातबारा नाही किंवा शेतउतारा कमी आहे. अशा सुशिक्षित व सुसंपन्न मुलाला मात्र लग्नाच्या बाजारात भाव मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोहळी समाजात विवाहाच्या प्रतिक्षेत असलेले अनेक उपवर मुले उपवर मुलीच्या शोधात दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर या समाजातील अनेक मुलांकडे सातबारा नसल्याने किंवा जमीन नसल्याने त्यांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने ते इतर समाजातील मुलीशी लग्न करण्यास तयार असल्याचे अनेक उपवर मुलांनी सांगितले. तळोधी (बा) परिसरातील वाढोणा, सावरगाव, उश्राळमेंढा हेटी, नवरगाव, रत्नापूर या गावात अनेक उपवर मुले लग्नाकरीता मुलीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. (वार्ताहर)
कोहळी समाजातील विवाह संस्कारात जमिनीच्या सातबार्याला प्राधान्य
By admin | Updated: May 31, 2014 23:24 IST