सुधीर खिरडकर : नांदाफाटा येथे पोलीस मित्र मेळाव्याचे आयोजननांदाफाटा : समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे. यासोबतच लोकभाग वाढून अवैध धंदे, अवैध दारू विक्रीची माहिती नागरिकांमार्फत होण्यासाठी पोलीस व जनतेचे मनोमिलन गरजेचे असल्याचे मत गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी व्यक्त केले.नांदाफाटा येथे पोलीस उपविभाग गडचांदूर अंतर्गत आयोजित पोलीस मित्र मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूरचे ठाणेदार विनोद रोकडे, गजानन विखे पाटील, किसन शेळके, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वैरागडे, अमोल पुरी, स्वप्नील निराळे, अभय चौभनकर, प्रा.सुभाष पार्लीकर, प्रा.विजय आकनुरवार, विठ्ठल डाखरे, भिमराव पवार, नासीर खान आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खिरडकर म्हणाले, जिल्ह्यात झालेली दारूबंदीची घोषणा ही समाज शांतता व स्वास्थासाठी हितकारक आहे. मात्र काही समाजकंटक अवैध दारूची विक्री करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. जिवती, कोरपना व राजुरा तालुक्यात जंगली मार्ग व पहाडांचा आडोसा घेत तेलंगाणामार्गे दारू येत असल्याची माहिती मिळते. याबाबत पोलीस प्रशासन करडी नजर ठेवून कार्य करीत असून काही अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र कधी कधी पोलिसांचे संख्याबळ कमी पडते. त्यामुळे जनतेचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचेही यावेळी ते म्हणाले. प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वैरागडे यांनी केले. संचालन पोलीस उपनिरीक्षक रामदास केंद्रे यांनी तर आभार ठाणेदार विनोद शेबुडे यांनी मानले. मेळाव्याला जिवती कोरपना तालुक्यातील पोलीस पाटील, पोलीस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
पोलीस व जनतेचे मनोमिलन गरजेचे
By admin | Updated: January 23, 2016 01:17 IST