आढावा बैठक : जिलाधिकाऱ्यांचे संबंधितांना आदेश चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना शामकुळे यांनी चंद्रपूर मतदारसंघातील विविध विषय मार्गी लावण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आढावा बैठक बोलावली होती. त्यामध्ये शहरातील घरमालकांना स्थायी पट्टे व गुंठेवारीच्या जमिनींची मोजणी सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिले आहेत. बैठकीमध्ये आ. शामकुळे यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील बाबुपेठ उड्डाणपुलाचे बांधकाम, चंद्रपूर शहरातील ३० ते ३५ वर्षांपासून नझूल जागेवर वास्तव्यास असलेल्या घरधारकांना मालकी हक्काचे स्थायी पट्टे, चंद्रपूर शहरातील गुंठेवारी, रामनगर - दाताळा येथील इरई नदीवर उंच पुलाचे बांधकाम, आदिवासी मुला - मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम, घुग्घुस येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आदी विविध विकास कामांचा आढावा यादरम्यान घेण्यात आला. यामध्ये संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. रखडलेले विषय त्वरित निकाली काढणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महापौर राखी कंचलार्वार, मनपा आयुक्त संजय काकडे, उपजिल्हाधिकारी रामटेके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर, उपमहापौर वसंता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोगुलवार, प्रकल्प अधिकारी वानखेडे, उपविभागीय अभियंता भोयर, मनपा शहर अभियंता बारई, गटनेते अनिल फुलझेले, सुभाष कसनगोट्टूवार, नगरसेवक रवी गुरनुले, अंजली घोटेकर, राहुल पावडे, देवानंद वाढई, ललिता गराड, माया उईके, जयश्री जुमडे, वनश्री गेडाम, धनंजय हुंड आदीसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्थायी पट्टे व गुंठेवारीच्या जमिनींची मोजणी सुरू होणार
By admin | Updated: July 18, 2016 01:49 IST